80081
साहित्यिकांकडून आवडीच्या पुस्तकावर विवेचन
आजगाव साहित्य प्रेरणाचा मासिक कार्यक्रम उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २६ ः आजगाव (सिंधुदुर्ग) येथील साहित्य प्रेरणा कट्ट्याचा ५७ वा मासिक कार्यक्रम नुकताच शिरोडा येथील रघुनाथ गणेश खटखटे ग्रंथालयात झाला. या कार्यक्रमात शेखर पणशीकर, सोमा गावडे, स्नेहा नारिंगणेकर व सरोज रेडकर यांनी आपल्या आवडीच्या पुस्तकांवर विवेचन केले.
नामवंत गायक शेखर पणशीकर यांनी प्रसिद्ध कवी गुरुनाथ शेणई यांच्या ‘बिजली आणि वादळ’ या काव्यसंग्रहाचा परिचय करून या संग्रहातील निवडक कवितांचे वाचन केले. सव्यासाची वाचक सोमा गावडे यांनी प्रा. अद्वयानंद गळतगे यांच्या ‘चमत्कारांचे विज्ञान’ या विज्ञान आणि अध्यात्म या वेगळ्या विषयावरील पुस्तकाविषयी माहिती देऊन, या पुस्तकातील एका प्रकरणाचे वाचन केले. लेखिका स्नेहा नारिंगणेकर यांनी साहित्यिक मधू मंगेश कर्णिक यांच्या ‘भाकरी आणि फूल’ या गाजलेल्या कादंबरीवर सविस्तर विवेचन करून त्यामधील पात्रांचा परिचय केला. साहित्य प्रेरणा कट्ट्याच्या ज्येष्ठ सदस्य सरोज रेडकर यांनी ज्ञानपीठ विजेते थोर साहित्यिक वि. स. खांडेकर यांच्या ‘ढगाआडाचं चांदणं’ या कथासंग्रहाचा परिचय करून या संग्रहातील ‘नवस’ ही कथा सारांश रूपाने सांगितली. त्यानंतर या पुस्तकांवर खुली चर्चा झाली. रघुनाथ गणेश खटखटे ग्रंथालयाच्या सहयोगाने आयोजित या कार्यक्रमात ग्रंथालयाचे कार्यवाह सचिन गावडे, कार्यकारिणी सदस्य सचिन दळवी, ग्रंथपाल प्राची पालयेकर, लिपिक अनिष्का रगजी, माजी ग्रंथपाल अर्चना लोखंडे, कार्यालयीन कर्मचारी सुधा साळगावकर, साहित्य प्रेरणा कट्ट्याचे समन्वयक विनय सौदागर, गजानन मांद्रेकर, रवींद्र पणशीकर, एकनाथ शेटकर, अविनाश जोशी, दिलीप पांढरे, जयदीप देशपांडे, अनिता सौदागर, नीलम कांबळे, गिरिधर राजाध्यक्ष, जयदीप देशपांडे, डॉ. गणेश मर्ढेकर, डॉ. अक्षय बिरगाळे, अनिल निखार्गे, भालचंद्र दीक्षित हे रसिक वाचक सहभागी झाले होते. विनय सौदागर यांनी स्वागत केले. नीलम कांबळे यांनी ऋणनिर्देश केला.