वसई जनता बँक पदमभूषण कै. वसंत दादा पाटील उत्कृष्ट नागरी सहकारी बँक पुरस्काराने सन्मानित
esakal July 27, 2025 10:45 AM

वसई जनता बँक नागरी सहकारी पुरस्काराने सन्मानित
विरार, ता. २६ (बातमीदार) ः वसई जनता सहकारी बँकेला राज्य सहकारी बॅंक असोसिएशन, मुंबईद्वारा पद्मभूषण कै. वसंतदादा पाटील उत्कृष्ट नागरी सहकारी बँक पुरस्काराने सन्मानित केले आहे. २०२३-२४ करिता हा पुरस्कार देण्यात आला आहे. हा कार्यक्रम यशवंतराव चव्हाण सेंटर येथे झाला.
पुरस्कार वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी सहकार राज्यमंत्री पंकज भोये होते. हा पुरस्कार बँकेचे अध्यक्ष महेश देसाई यांना प्रदान करण्यात आला. बँकेचे उपाध्यक्ष विवेक काणे, वरिष्ठ संचालक संदेश जाधव, संचालक हेमंतकुमार वझे, संचालक मकरंद सावे व अधिकारी मायकल डायस आदी या वेळी उपस्थित होते.
वसई जनता सहकारी बँकेने आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये स्पृहणीय कामगिरी केली असून विशेषत्वाने अनुत्पादित कर्ज खात्यांवर कमालीचे नियंत्रण ठेवून ढोबळ एनपीएचे शेकडा प्रमाण १.७८ टक्के मर्यादित ठेवून एक आदर्श निर्माण केला आहे. बँकेच्या या यशाबद्दल बँकेचे सभासद, ठेवीदार व कर्जदार यांनी आनंद व्यक्त केलेला आहे. त्याबाबत बँकेचे अध्यक्ष महेश देसाई यांनी बँकेच्या यशाचे श्रेय बँकेचे सर्व संचालक, बी.ओ.एम. सदस्य, मार्गदर्शक माजी आमदार हितेंद्र ठाकूर व कर्मचाऱ्यांचे असून सर्व वसईकर व पालघर जिल्ह्यातील जनता वसई जनता सहकारी बँकेला अशाच प्रकारचे सहकार्य करील, असा आशावाद व्यक्त केला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.