Maharashtra Rain Forecast : महाराष्ट्राची चिंता वाढणार, 'या' 8 जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा, IMD कडून रेड अलर्ट
Tv9 Marathi July 27, 2025 12:45 PM

महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसानं धुमाकूळ घालण्यास सुरूवात केली आहे. महाराष्ट्रातील काही भागांना मुसळधार पावसानं झोडपल्यानं पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच भारतीय हवामान खात्याने अर्थान IMD ने महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. हिंगोली, नांदेड, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगरला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. यासह जळगाव, धुळे आणि नाशिक जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला असून मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त आला आहे.

राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत असून, अनेक ठिकाणी नागरिकांची दाणादाण उडाली आहे. हवामान खात्याने चंद्रपूर जिल्ह्यासाठी दोन दिवसांचा रेड अलर्ट जारी केला आहे. काल आणि आज चंद्रपूरमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होतोय. काल रेड अलर्टमुळे शाळा, महाविद्यालये आणि प्रायव्हेट कोचिंग क्लासेस बंद ठेवण्यात आल्या होत्या. सलग पावसामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील नदीनाले, ओढे दुथडी भरून वाहत आहेत. तर जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील हतनूर धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आले आहेत. धरणातून 8 हजार 405 क्यूसेक पाण्याचा विसर्ग तापी नदीपात्रात केला जात आहे.

पुण्यातील खेड तालुक्यातील चासकमान धरण 90% भरले असून, खबरदारी म्हणून त्याचे पाचही दरवाजे उघडण्यात आले आहेत. 3552 क्यूसेक पाण्याचा विसर्ग भीमा नदीपात्रात केला जात आहे. पालघर जिल्ह्यात हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला असून, सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तानसा नदी काही प्रमाणात पूर आलेला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.