Piyush Goyal Kolhapuri Chappals : भारत आणि इंग्लंडचा मुक्त व्यापार करार हा आतापर्यंतच्या सर्व मुक्त व्यापार करारांपैकी सर्वाधिक लाभदायक करार आहे. यामुळे भारतातील जीआय उत्पादनांना इंग्लंडची बाजारपेठ खुली होणार आहे. या करारामुळे एकटी कोल्हापुरी चप्पल आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आठ ते दहा हजार कोटींचा व्यापार करू शकेल, असा विश्वास वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांनी शनिवारी व्यक्त केला.
राज्यांना निर्यातीसाठी सक्षम बनविण्यासाठी वाणिज्य मंत्रालयातर्फे सर्व राज्यांशी संपर्क साधण्याची घोषणाही त्यांनी केली. भारत आणि इग्लंडचा मुक्त व्यापार करार नुकताच मार्गी लागला असून, ब्रिटिश संसदेने यावर शिक्कामोर्तब केल्यानंतर औपचारिक अंमलबजावणीला सुरुवात होणार आहे. गोयल यांनी शनिवारी या कराराची सविस्तर माहिती दिली. महाराष्ट्रापासून पश्चिम बंगालपर्यंत आणि काश्मीरपासून केरळपर्यंत सर्व राज्यांतील उत्पादनांना इंग्लंडच्या बाजारपेठेचे दरवाजे खुले करणारा हा गेमचेंजिंग व्यापार करार असल्याचा दावा त्यांनी केला. ते म्हणाले, ‘‘राज्यांची जीआय उत्पादने निर्यात होतील. अलीकडेच एका आंतरराष्ट्रीय कंपनीने कोल्हापुरी चपलेचे डिझाईन वापरले होते. त्यावर वाणिज्य मंत्रालयाने लगेच आक्षेप घेतला.
आपल्या उत्पादनांना त्यांचे श्रेय देण्याचा आपला अधिकार आहे.’’ या करारामुळे कोल्हापुरी चपलेची निर्यात होईल. एकटी कोल्हापुरी चप्पलच आंतरराष्ट्रीय बाजार पेठेत आठ ते दहा हजार कोटींचा व्यापार करू शकेल, अशी तिची रचना आहे, असे ठामपणे गोयल यांनी सांगितले.
तब्बल २३ वर्षांनंतर हा करार पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वामुळे मार्गी लागल्याचा दावा करताना ते म्हणाले, भारताने अतिशय आत्मविश्वासाने वाटाघाटी केल्या. या करारातून मिळणारा लाभ येत्या वर्षांमध्ये सर्वांना दिसेल. भारताने कृषी, डेअरी, साखर उद्योग इथेनॉल उद्योग यासारख्या संवेदनशील क्षेत्रांना या व्यापार करारातून संरक्षित ठेवले असून, यासाठी पंतप्रधान मोदींचा स्पष्ट आदेश होता. त्यामुळे भारतात आयात होणाऱ्या इंग्लंडच्या डेअरी उत्पानांना शुल्क लागेल, असे ते म्हणाले.
Kolhapur Paytan : कोल्हापुरी पायतानला अच्छे दिन..., ब्रिटनमध्ये विकता येणार चप्पलकॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारने आसियान देशांशी व्यापार करार केला. भारताशी स्पर्धा करणारे हे देश असल्याने त्यांनी त्यांची स्वस्त उत्पादने भारतीय बाजारात पाठवली. मात्र, भारतीय उत्पादनांना आपले दरवाजे बंद ठेवले. या उलट पंतप्रधान मोदींनी मॉरिशस, ऑस्ट्रेलिया, स्वित्झर्लंड, नॉर्वे, आइसलँड आणि लिकटेंस्टीन या युरोपातील चार देशांचा समावेश असलेल्या ईएफटीए या युरोपीय मुक्त व्यापार संघाशी झालेल्या करारांची उदाहरणे देताना अमेरिका, ओमान, चिली या देशांशी तसेच युरोपीय महासंघाशी मुक्त व्यापार कराराच्या वाटाघाटी सुरू असल्याचे सांगितले.
इचलकरंजीसारख्या केंद्रांना लाभ मिळणार
वाणिज्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार भारत इंग्लंड मुक्त व्यापार करारामुळे महाराष्ट्रातून अभियांत्रिकी उपकरणे, वस्तू, जेनेरिक औषधे, तयार वस्त्रपावरणे यासारख्या वस्तूंची निर्यात वाढेल. त्यातही पुणे, मुंबई, इचलकरंजीसारख्या औद्योगिक केंद्रांना विशेष लाभ मिळेल. औषधनिर्माण, जेम्स अॅन्ड ज्वेलरी, वस्त्रोद्योग यांना संधी मिळेल, रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.
यासोबतच, गुजरातमधील अहमदाबादमधील औषध निर्माण, सूरत व भरूचमधून रसायनांची निर्यात, राजकोटमधून अभियांत्रिकी उत्पादने, वेरावलमधून सागरी उत्पादनांची निर्यात वाढेल.तमिळनाडूमधून तिरुपूर, वेल्लोर, तसेच चेन्नई यासारख्या केंद्रांमधून चामड्याच्या वस्तू, कापड, अभियांत्रिकी उपकरणांची निर्यात होईल. त्याचप्रमाणे, कर्नाटकमधून इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, उपकरणे, यंत्रसामग्रीची निर्यात, आंध्र प्रदेशातून सागरी उत्पादने, वस्त्रप्रावरणे, ओडिशातून हस्तकला वस्तू, पश्चिम बंगालमधून चामड्याच्या वस्तू, केरळमधून मसाल्याचे पदार्थ निर्यातीला मोठी संधी असेल.