पुणे, ता. २५ : आपल्या अनोख्या आवाजाने, बहुरंगी गायकीने आणि संगीतप्रेमींच्या हृदयात अढळस्थान मिळविलेल्या किशोरकुमार यांच्या ९६व्या जन्मदिनानिमित्त ‘दो किशोर’ या विशेष संगीत मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. चार ऑगस्टला सायंकाळी ६.३० वाजता जंगली महाराज रस्त्यावरील बालगंधर्व रंगमंदिर येथे ही मैफील रंगणार आहे.
या संगीत मैफलीतून किशोरकुमार यांच्या अजरामर गीतांना आधुनिक साज चढवून, पुण्यातील आणि आसपासच्या भागांतील रसिकांना एक आगळी-वेगळी संगीतवेडी संध्याकाळ अनुभवता येणार आहे. किशोरकुमार यांच्या कारकिर्दीतील ‘कोरा कागज़ था ये मन मेरा’, ‘रूप तेरा मस्ताना’, ‘ये रात ये मौसम’, ‘जिंदगी एक सफर है सुहाना’, ‘एक चतुर नार’, ‘मेरे सामने वाली खिड़की में’, ‘तेरे मेरे मिलन की ये रैना’, ‘गाता रहे मेरा दिल’ यांसारख्या अनेक लोकप्रिय आणि भावस्पर्शी गीतांना आणि हिंदी चित्रपटगीतांच्या सुवर्णकाळाला या कार्यक्रमात उजाळा मिळणार आहे. किशोरकुमार यांची निवडक गाणी या वेळी जितेंद्र भुरूक आणि मकरंद पाटणकर आपल्या सहकाऱ्यांसह सादर करतील. ‘लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायटी लि. आणि कोहिनूर ग्रुप-अ कृष्णकुमार गोयल एंटरप्राईज हे या कार्यक्रमाचे सहयोगी प्रायोजक आहेत.
तिकिटांचे तपशील
या कार्यक्रमाची तिकिटे bookmyshow.com वर, तसेच बालगंधर्व रंगमंदिर येथे रविवारपासून (ता. २७) सकाळी ९ ते ११.३० आणि सायंकाळी ५ ते ८ या वेळेत उपलब्ध आहेत. जागा मर्यादित असल्यामुळे रसिकांनी आपली तिकिटे लवकरात लवकर बुक करावीत, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
हे लक्षात ठेवा
काय : ‘दो किशोर’ संगीत मैफील
कधी : ४ ऑगस्ट, सोमवार
केव्हा : सायंकाळी ६:३० वाजता
कुठे : बालगंधर्व रंगमंदिर, जंगली महाराज रस्ता