टीम इंडियाचा कॅप्टन शुबमन गिल याने मँचेस्टरमध्ये इंग्लंड विरूद्धच्या चौथ्या कसोटीतील पाचव्या दिवशी झुंज देत इतिहास घडवला आहे. शुबमनने दिवसातील पहिल्या सत्रात शतक ठोकत धमाका केला आहे. भारताने चौथ्या दिवशी दुसऱ्या डावात झटपट 2 विकेट्स गमावल्या. त्यानंतर केएल राहुल आणि शुबमन गिल या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी दीडशतकी भागीदारी करत भारताचा डाव सावरला. केएल राहुल पाचव्या दिवशी आऊट झाला. या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी 188 धावांची भागीदारी केली. तर शुबमनने दुसरी बाजू लावून धरत शतक झळकावलं.
शुबमनने 228 बॉलमध्ये 12 फोरसह 43.86 च्या स्ट्राईक रेटने शतक पूर्ण केलं. शुबमनचं कसोटी कारकीर्दीतील हे नववं शतक ठरलं. शुबमने या शतकासह अनेक विक्रमांची बरोबरी साधली. तसेच शुबमनने भारताची 35 वर्षांची प्रतिक्षा संपवली. शुबमन मँचेस्टरमध्ये 1990 नंतर शतक करणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला. भारतासाठी या मैदानात शेवटचं कसोटी शतक हे सचिन तेंडुलकर याने केलं होतं. सचिनचं ते पहिलंवहिलं आंतरराष्ट्रीय शतक ठरलं होतं. त्यानंतर एकाही भारताला अशी कामगिरी करता आली नव्हती. मात्र आता शुबमनने शतक झळकावत साडे तीन दशकांची प्रतिक्षा संपवली.
शुबमनने या शतकासह दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी केली. शुबमन एका कसोटी मालिकेत सर्वाधिक 4 शतकं करणारा एकूण तिसरा तर भारताचा दुसरा कर्णधार ठरला. शुबमनने याबाबतीत दिग्गज सर डॉन ब्रॅडमॅन आणि सुनील गावसकर या दोघांच्या विक्रमाची बरोबरी साधली. ब्रॅडमॅन आणि गावसकर या दोघांनी मायदेशात झालेल्या कसोटी मालिकेत कर्णधार म्हणून ही कामगिरी केली होती. तर शुबमनने परदेशात हा कारनामा करुन दाखवला आहे.
शुबमनआधी 1990 साली मँचेस्टरमध्ये झालेल्या सामन्यात भारतासाठी 2 फलंदाजांनी शतक केलं होतं. पहिल्या डावात कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन याने शतक झळकावलं होतं. तर दुसऱ्या डावात सचिनने शेकडा पूर्ण केला होता.