अलिबाग एसटी बस आगाराची दुरवस्था
esakal July 28, 2025 12:45 AM

अलिबाग एसटी बस आगाराची दुरवस्था
खड्ड्यांमुळे चालक, प्रवाशांचे हाल; सुविधांचाही अभाव
अलिबाग, ता. २७ (वार्ताहर) ः अलिबाग एसटी बस आगाराची अवस्था बिकट झाली आहे. ठिकठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. एसटी बसेस वेळेवर न लागणे, फलाटाजवळील कठडे तुटणे अशा असुविधांचा फटका प्रवाशांना बसत आहे, मात्र एसटी प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने प्रवाशांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
अलिबाग हे जिल्ह्याचे महत्त्वाचे ठिकाण आहे. पर्यटनाबरोबरच नोकरी, व्यवसायानिमित्त अलिबागला येणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने प्रवासी अलिबागला ये-जा करतात. त्यामुळे एसटी बसमधून प्रवास करण्यावर अधिक भर दिला जातो. एसटीमध्ये प्रवासी वाढावे, म्हणून एसटी महामडंळाकडून वेगवेगळ्या सवलती देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांसह ज्येष्ठ नागरिक व नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या सवलतींचा फायदा मोठ्या प्रमाणात होतो. प्रवाशांना त्यांच्या निश्चित स्थळी वेळेवर पोहोचता यावे, म्हणून विना थांबा अलिबाग-पनवेल बससेवा सुरू करण्यात आली आहे, मात्र बस वेळेवर लागत नसल्याच्य तक्रारी वाढू लागल्या आहेत. डिझेलच्या जागी सीएनजीवर चालणाऱ्या बस सुरू करूनही वेळेवर बस लागत नसल्याचे बोलले जात आहे. सीएनजी भरण्यासाठी विलंब लागत असल्याचा फटका प्रवाशांना बसत आहे. तसेच स्थानकात गेल्या अनेक महिन्यांपासून ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. तसेच स्थानकातील फलाटाजवळील कठडा तुटून अनेक दिवस उलटून गेले आहे; मात्र त्याची डागडुजी अजूनही करण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
...............
चौकट :
सध्या बस रस्त्यात बंद पडण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो. अनेक वेळा शिवशाही बसने निघालेल्या प्रवाशांना बस मध्येच बंद पडल्याने साध्या बसने पुढील प्रवास करावा लागतो. यासोबतच ग्रामीण भागात जाणाऱ्या अनेक बस या जुन्या आणि गळक्या आहेत. त्यामुळे उभ्याने प्रवाशांना प्रवास करावा लागतो.
..............
चौकट :
विभागीय अभियंत्यांचे पत्राकडे दुर्लक्ष
अलिबाग बसस्थानकासह रेवदंडा बसस्थानकातील खड्ड्यांमुळे वाहनांचा बिघाड होण्याबरोबर प्रवाशांनादेखील त्रास होत आहे. मोठमोठे खड्डे स्थानकाच्या परिसरात पडले आहेत. या खड्ड्यांमुळे बस आदळत आहे. बसच्या स्प्रिंग व टायरचे नुकसान होत आहे. खड्ड्यांमुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे खड्डे लवकरात लवकर भरण्यात यावे असे, पत्र अलिबाग एसटी बस आगारातून पेणमधील रामवाडी येथील विभागीय अभियंत्यांना पाठविण्यात आले आहे. पत्र पाठवून एक ते दोन महिने होत आली आहेत, मात्र विभागीय अभियंत्यांकडून या पत्राची दखल घेण्यात आलेली नाही.
................
चौकट :
अलिबाग स्थानकामधून मोठ्या प्रमाणावर प्रवासी ये-जा करतात. खड्ड्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. खड्ड्यांबाबत प्रवाशांच्या तक्रारी वाढत आहेत. अलिबाग स्थानकातील व रेवदंडा बसस्थानकातील खड्डे लवकरात लवकरत भरण्यात यावेत, अशी मागणी विभागीय अभियंता यांच्याकडे करण्यात आली आहे, असे अलिबाग आगार व्यवस्थापक राकेश देवरे यांनी सांगितले.
...............
चौकट :
अलिबाग आगारात एकूण ७६ एसटी बस आहेत. त्यामध्ये १७ शिवशाही, सीएनजीवर चालणाऱ्या बस ४९ आणि साध्या बस ११ आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.