Uddhav Thackeray: पुढचा काळ नक्कीच चांगला! राज ठाकरेंच्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंचं भावनिक विधान; म्हणाले...
esakal July 28, 2025 03:45 AM

मुंबई : राजकारणात कटुता निर्माण झाल्यानंतर आता ठाकरे बंधूंमध्ये सौहार्दाचे क्षण पाहायला मिळत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. या शुभेच्छांनी राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून, युतीचे संकेत मिळत असल्याचे बोलले जात आहे. दोघांमधील ताणतणाव कमी होऊन नवे समीकरण तयार होणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, राज ठाकरेंच्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

उद्धव ठाकरे यांच्या ६५व्या वाढदिवसानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वतः मातोश्रीवर गेले आणि मोठ्या भावाला शुभेच्छा दिल्या. या भेटीनंतर बोलताना उद्धव ठाकरे यांनी ‘पुढचा काळ नक्कीच चांगला!’असे भावनिक विधान केल्याने दोघांचे मनोमिलन सकारात्मक दिशेने सुरू असल्याचे बोलले जात आहे. या भेटीनंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत आपल्या भावना व्यक्त केल्या. ‘‘भेटीमुळे आनंद द्विगुणित झाला. खरे तर द्विगुणित नाही, अनेक पटींनी आनंद वाढला. अनेक वर्षांनी भेटलो आणि तेही आपल्या बालपणाच्या आठवणींनी भरलेल्या खोलीत. त्यामुळे हा क्षण खूप खास आहे, पुढचा काळ नक्कीच चांगला!’’असे त्यांनी सांगितले.

Mumbai Local Megablock: मेगाब्लॉकमुळे मुंबईकरांचे ‘मेगाहाल’; सुट्टीच्या दिवशी घराबाहेर पडले महागात भास्कर जाधव यांची प्रतिक्रिया

ठाकरे बंधूंच्या मनोमिलनावर भास्कर जाधव यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. ‘‘दोन्ही भावांनी न बोलता करून दाखवले. ही भविष्याची नांदी आहे,’’ अशा शब्दांत भास्कर जाधव यांनी राज-उद्धव भेटीचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, की या प्रसंगाने दुभंगलेला महाराष्ट्र पुन्हा एकसंध झाला असून, ही भावना प्रत्येक मराठी माणसाला उभारी देणारी व प्रेरणादायी आहे. राज ठाकरे यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्याने आजचा दिवस मराठी समाजासाठी सकारात्मक व ऐतिहासिक ठरणारा आहे. ही भेट केवळ वैयक्तिक नव्हे; तर महाराष्ट्रातील राजकीय व भावनिक समीकरणांना नव्याने दिशा देणारी ठरू शकते, अशी ठाम भूमिका भास्कर जाधव यांनी मांडली.

राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

‘जेएनयू’चे प्राध्यापक आणि राजकीय विश्लेषक सुमित म्हसकर यांच्या मते, ‘ठाकरे बंधू एकत्र येतील याचे संकेत देणाऱ्या अनेक घडामोडी सध्या घडत आहेत. ठाकरे बंधू आपण एकत्र येत असल्याचे संकेत त्यातून देत आहेत. हे त्यांचे पाऊल युतीच्या दिशेनेच असल्याचे दिसते. भाजप आणि शिंदेंची शिवसेना या पक्षांमध्ये काहीसा गोंधळ दिसतोय. याचाच फायदा ठाकरे बंधूदेखील उठवत असल्याचे दिसते.

ठाकरे बंधूंची भेट हे युतीचे संकेत!

आज राज ठाकरेंनी बऱ्याच वर्षांनंतर ‘मातोश्री’ची पायरी चढून एक नवीन शक्यता दाखवली आहे. असे करून त्यांनी आणखी एक पर्याय खुला केला आहे. राज ठाकरे यांनी यासाठी पुढाकार घेऊन आपली व्हॅल्यूदेखील वाढवली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने ठाकरेंना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षापेक्षा मनसेसोबत जाणे अधिक फायद्याचे ठरणार आहे. यामुळे राज ठाकरे आपली बार्गेनिंग पॉवरदेखील वाढवत आहेत, असे दिसते.’

मानवी डोळा किती मेगापिक्सेलचा असतो? उत्तर जाणून व्हाल थक्क... एक प्रकारे शिक्कामोर्तब!

राजकीय विश्लेषक जयंत माईणकर यांच्या मते, ‘मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वतः पुढाकार घेऊन इतक्या वर्षांनी मातोश्रीवर जाण्याचा निर्णय घेणे, तिथे जाऊन उद्धव ठाकरेंना भेटून शुभेच्छा देणे यामध्ये त्यांनी एकत्र येण्याचे संकेत नक्कीच दिले आहेत. आम्ही दोघे भाऊ एकत्र येऊ, असा संदेश त्यांनी आपल्या आजच्या कृतीतून आपल्या कार्यकर्त्यांना दिला आहे. त्यांच्या आगामी युतीवर हे एक प्रकारे शिक्कामोर्तब केल्यासारखेच आहे. राज्याच्या राजकारणामध्ये शिवसेना आणि त्यांची मते ही तीन पक्षांमध्ये विभागली गेली आहेत; पण मुंबई आणि मराठीचा मुद्दा पाहिला तर तो ठाकरेंशी अधिक जुळून येतो. या गोष्टी लक्षात घेऊन राज ठाकरे यांनी हे ठरवून उचललेले पाऊल दिसते आणि हे दोन्ही ठाकरे बंधूंना मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून फायद्याचे ठरेल असे दिसते.’

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.