भारतीय क्रीडा संघाने चौथ्या कसोटी सामन्यात मान उंचावेल अशी कामगिरी केली आहे. चौथ्या दिवसापर्यंत हा सामना इंग्लंडच्या पारड्यात झुकलेला होता. पण भारताने इंग्लंडच्या विजयाच्या आशेवर पाणी टाकलं. तसेच मालिका विजयाचं स्वप्नही लांबवलं. पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चार सामने पार पडले असून 2-1 अशी स्थिती आहे. त्यामुळे या मालिकेचा निकाल आता पाचव्या कसोटी सामन्यावर ढकलला गेला आहे. पाचवा कसोटी सामना भारताने जिंकला तर मालिका ड्रॉ होईल. तसेच इंग्लंडने जिंकला तर मालिका 3-1 ने जिंकतील. हे गणित पाचव्या सामन्यात असलं तरी चौथ्या सामन्यात भारताने इंग्लंडची चांगलीच जिरवली. खरं तर सामना इंग्लंड जिंकेल अशीच स्थिती होती. पण भारतीय फलंदाजांनी चौथ्या आणि पाचव्या दिवशी कडवी झुंज दिली आणि सामना ड्रॉ करून दाखवला. हा सामना ड्रॉ करण्यात खऱ्या अर्थाने भारताने विजय मिळवला आहे.
नाणेफेकीचा कौल गमावल्यानंतर भारताच्या वाटेला फलंदाजी आली. भारताने पहिल्या डावात सर्व गडी गमवून 358 धावा केल्या. इंग्लंडने या धावांचं आव्हान मोडून काढून पहिल्या डावात 669 धावा केल्या. तसेच 311 धावांची मजबूत आघाडी घेतली. ही आघाडी मोडून काढताना भारतीय संघ नांगी टाकेल असंच वाटत होतं. पण चौथ्या आणि पाचव्या दिवशी भारतीय फलंदाजांनी इंग्लंडची कंबर मोडली. भारताने दोन दिवस फलंदाजी केली. इंग्लंडचा प्रत्येक हल्ला परतवून लावला. पहिल्याच षटकात दोन विकेट शून्यावर बाद झालेले असताना कडवी झुंज दिली.
असा फिरवला सामनायशस्वी जयस्वाल आणि साई सुदर्शन हे फलंदाज शून्यावर तंबूत परतले होते. त्यामुळे भारतावर दडपण वाढलं होतं. त्यानंतर कर्णधार शुबमन गिल आणि केएल राहुल यांनी जबरदस्त भागीदारी केली. चौथ्या दिवशी या दोघांनी विकेट न देता झुंज दिली. पाचव्या दिवशीचा खेळ सुरु झाला तेव्हा भारतीय संघ 188 धावांवर असताना केएल राहुल 90 धावा करून बाद झाला. त्यामुळे आता काही खरं नाही असंच वाटत होतं. पण शुबमन गिल आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी खेळ पुढे नेला. या दोघांची 34 धावांची भागीदारी झाली आणि शुबमन गिल बाद झाला. शुबमन गिल 103 धावा करून तंबूत गेला.
वॉशिंग्टन सुंदर आणि रवींद्र जडेजा यांनी इंग्लंडला शेवटपर्यंत झुंजवलं. पाचव्या विकेटसाठी या दोघांनी 204 धावांची भागीदारी केली. यात वॉशिंग्टन सुंदरने नाबाद 101 आणि रवींद्र जडेजाने नाबाद 107 धावांची खेळी केली. त्यामुळे हा सामना ड्रा करण्याची वेळ आली. खऱ्या अर्थाने हा सामना केएल राहुल, शुबमन गिल, वॉशिंग्टन सुंदर आणि रवींद्र जडेजा यांनी फिरवला.