गेल्या काही दिवसांपासून विमान अपघाताच्या घटना झपाट्याने वाढल्या आहेत. अहमदाबाद विमान अपघातानंतर बांगलादेशमध्येही एक विमान कोसळल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता अमेरिकेत एका विमानाला आग लागल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. आग लागल्याचे लक्षात येताच विमानातील सर्व 179 जणांना ताबडतोब बाहेर काढण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार शनिवारी अमेरिकन एअरलाइन्सच्या एका विमानाला डेन्व्हर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आग लागल्याची घटना घडली आहे. हे विमान धावपट्टीवर उभे होते, तेव्हा विमानाच्या डाव्या मुख्य लँडिंग गियरला आग लागली. त्यानंतर तात्काळ विमानातील प्रवाशांना खाली उतरवण्यात आले. याचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये लोक घाबरले दिसत आहेत.
विमानाच्या चाकामध्ये लागली आग
समोर आलेल्या माहितीनुसार हे विमान मियामीला जाणार होते. हे विमान धावपट्टीवर असताना त्याला आग लागल्याचे दिसून आले. त्यामुळे विमानात बसलेल्या प्रवाशांना आणि क्रू मेंबर्सना आपत्कालीन स्लाइड्सद्वारे बाहेर काढण्यात आले. या घटनेत विमानाचे मोठे नुकसान झाले असल्याची माहिती समोर आली आहे. आता हे विमान दुरुस्तीसाठी नेण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे.
American Airlines plane caught fire on the tarmac in Denver Colorado! pic.twitter.com/OKQXrQruKY
— Ramdeep Mishra (@ramdeepmishra11)
सर्व प्रवासी सुरक्षित
या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. एका व्यक्तीला किरकोळ दुखापत झाली आहे. 173 प्रवासी आणि 6 क्रू मेंबर्स सुरक्षित असल्याचे समोर आले आहे. आता ही घटना का घडली याचा तपास केला जात आहे. आगीच्या या घटनेमुळे विमानतळावरील सेवा काही काळ विस्कळीत झाली होती. अपघातानंतर हे विमान तात्काळ सेवेतून हटवले असून त्याची दुरुस्ती केली जात आहे.
या अपघाताबाबत एक निवेदन सादर करताना अमेरिकन एअरलाइन्सने म्हटले की, विमानाने टेकऑफ घेण्याच्या आधी विमानाच्या लँडिंग गियरच्या टायरमध्ये समस्या निर्माण झाली आणि आग लागली. या अपघातानंतर सर्व प्रवासी आणि क्रू मेंबर्स सुरक्षित आहेत. सध्या या विमानाची तपासणी केली जात आहे. तपासणीनंतर विमान उड्डाणासाठी तयार होईल आणि त्यानंतर पुन्हा हे विमान सेवेत दाखल होईल असं कंपनीने म्हटले आहे.