लंडनच्या ल्युटन विमानतळावरून ग्लासगोला जाणाऱ्या इझीजेट एअरलाइन्सच्या विमानात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. त्या विमानात उपस्थित असलेल्या एका प्रवाशाने अचानक गोंधळ घातला आणि एकच गदारोळ माजला. हंगामा करणाऱ्या प्रवाशाने जोरजोरात ओरडतच ते विमान बॉम्बने उडवण्याची धमकी दिली. एवढंच नव्हे तर त्याने मोठमोठ्याने ओरडत अमेरिका मुर्दाबाद असे नारे लगावले, ट्रंप मुर्दाबाच्या घोषणाही दिल्या. विमानत उभं राहून असा गोंधळ घालणाऱ्या इसमाला अखेर बेड्या ठोकत अटक करण्यात आली असून त्याची चौकशीदेखील करण्यात येत आहे.
जेव्हा हे विमान ग्लासगो विमानतळावर उतरले तेव्हा ट्रम्प मुर्दाबादच्या घोषणा देणाऱ्या व्यक्तीला स्कॉटलंडमधून अटक करण्यात आली. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मी विमान बॉम्बने उडवून देईन असं म्हणत तो इसम मोठमोठ्याने ओरडत होता. याशिवाय, व्हिडिओमध्ये तो इसम’अमेरिका मुर्दाबाद’, ‘ट्रम्प मुर्दाबाद’ आणि ‘अल्लाह हू अकबर’ अशा घोषणा देत असल्याचेही दिसत होता. त्यानंतर विमानात उपस्थित असलेल्या दुसऱ्या प्रवाशाने त्याला पकडून खाली पाडलं.
मोठा संघर्ष टळला
मिळालेल्या माहितीनुसार, विमानात गोंधळ घालणाऱ्या त्या इसमाचे वय 41 वर्षे असल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, इंटरनेटवर व्हायरल झालेल्या या व्हिडिओची दहशतवाद विरोधी विभाग चौकशी करत आहे. या गोंधळानंतरही विमानातील सर्व प्रवासी सुरक्षित आहेत, कोणत्याही प्रवाशाचे कोणतेही नुकसान झालेले नाही. प्रवाशांच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड केलेली नाही, असे ग्लासगो टाइम्सच्या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे. .
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पाच दिवसांच्या स्कॉटलंड दौऱ्यावर गेले आहेत. युरोपियन युनियनच्या प्रमुख उर्सुला वॉन डेर लेयन यांच्याशी ट्रम्प यांच्या ऐतिहासिक करारामुळे ट्रान्सअटलांटिक टॅरिफवरील वाद संपला आहे, ज्यामुळे मोठ्या संघर्षाची शक्यता टळली आहे. ट्रम्प यांच्या भेटीलाही विरोध केला जात आहे.