नागपूर: सिबिल स्कोर खराब असल्याने कर्ज मिळवून देण्याची बतावणी करीत, घर गहाण ठेवून महिलेची तीन ठकबाजांनी १६ लाख ६० हजारांनी फसवणूक केली. याप्रकरणी पौर्णिमा प्रमोद गजभिये (वय ४७, गणेशनगर, दाभा) यांनी दिलेल्या तक्रारीवरून गिट्टीखदान पोलिसांनी तीन ठकबाजांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
वर्षा भेंडे (वय ४५), सारंग भेंडे (वय २७, दोन्ही रा. बेसा रोड, मनीषनगर, बेलतरोडी), राजेंद्र विठोबा दियेवार (रा. गोपालनगर) अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पौर्णिमा गजभिये गृहिणी असून त्यांना २०२३ मध्ये काही व्यवसाय सुरू करायचा असल्याने कर्जाची गरज होती.
त्यामुळे त्यांनी मोबाइलवर ऑनलाइन सर्च केले असता, त्यांना वर्षा भेंडे या महिलेचा क्रमांक सापडला. त्यांनी त्यावर संपर्क केला असता, त्यांना भेंडे यांनी कर्ज मिळवून देण्याची बतावणी केली. आपल्या मुलाच्या मदतीने त्यांनी कर्जाच्या नावावर त्यांच्याकडून घराच्या कागदपत्रांसह, कोरे धनादेश आणि कोऱ्या कागदांवर स्वाक्षरीही घेतल्या.
त्या आधारे त्यांनी त्यांचे घराची रजिस्ट्री राजेंद्र विठोबा दियेवार यांच्या नावावर लावून दिली. त्या रजिस्ट्रीच्या आधारे दियेवार यांनी होमफर्स्ट फायनंस कंपनीकडून १८ लाख ५० हजारांचे कर्ज घेतले. ते घेण्यासाठी त्यांनी पौर्णिमा गजभिये यांच्या खात्यात ४ लाख रुपये दाखविले. याशिवाय लोनची रक्कम खात्यात जमा होताच, त्यातून १ लाख ९० हजार रुपये देत, १६ लाख ६० हजार काढून विविध व्यक्तीच्या नावावर पाठविले.
Needle Free Injections: सुईविरहित इंजेक्शनमुळे बालकांची भीती होणार दूर; डॉ.अविनाश गावंडे यांचा विश्वास, लसीकरणामध्ये वाढतोय वापरकर्जाचे हफ्ते थकल्याने फायनान्स कंपनीने त्यांना संपर्क केला असता, त्यांना ही बाब कळली. त्यांनी वर्षा शेंडे यांच्याशी संपर्क केला असता, पैसे देण्यास त्यांनी टाळाटाळ केली. त्यावरून त्यांनी गिट्टीखदान पोलिसांना दिलेल्या तक्रारीवरून पोलिस उपनिरीक्षक राठोड यांनी तपास करीत तिघांविरोधात गुन्हा दाखल केला.