अभिनेत्री करिश्मा कपूरचा पूर्व पती आणि बिझनेसमन संजय कपूरच्या निधनानंतर त्याच्या संपत्तीच्या वारसा हक्कावरून वाद निर्माण झाला आहे. संजय हा खूप मोठा उद्योगपती होता. तो सोना कॉमस्टार या कंपनीचा तो अध्यक्ष होता. जून महिन्यात पोलो खेळताना हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचं निधन झालं होतं. आता त्याच्या निधनानंतर आई राणी कपूर यांनी कंपनीच्या भागधारकांना एक पत्र लिहिलं आहे. त्यांच्या कुटुंबाचा वारसा हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. संजयची संपत्ती तब्बल 30 हजार कोटी रुपये असल्याचं म्हटलं जात आहे.
सोना कॉमस्टार या कंपनीची वार्षिक सर्वसाधारण सभा 25 जुलै रोजी पार पडली. त्याआधी 24 जुलै रोजी राणी कपूर यांनी पत्रात लिहिलं, ‘माझ्या मुलाच्या अकस्मात निधनानंतर, त्याने स्थापन केलेल्या ग्रुपवर परिणाम करणाऱ्या सर्व निर्णयांमधून मला जाणूनबुजून वगळण्यात आलं आहे. मी माझ्या पतीच्या नोंदणीकृत मृत्यूपत्राची एकमेव लाभार्थी आणि बहुसंख्य शेअरहोल्डरसुद्धा आहे.’ भावनिक परिस्थितीचा फायदा घेत काही कागदरत्रांवर स्वाक्षरी करण्यास भाग पाडल्याचाही आरोप राणी यांनी केला. “माझी स्वाक्षरी बंद दाराआड घेतली गेली. मला कंपनीच्या अकाऊंट्सची माहिती देण्यात आली नाही”, असं त्यांनी पुढे म्हटलंय.
कंपनीने काय म्हटलंय?राणी कपूर यांच्या आरोपांवर कंपनीकडूनही प्रतिक्रिया देण्यात आली आहे. त्यांनी निवेदन जाही करत म्हटलंय की सर्व निर्णय कॉर्पोरेट कायदे आणि नियामक मुदतीनुसार घेण्यात आले आहेत. कंपनीने स्पष्ट म्हटलंय की, राणी कपूर त्यांच्या रेकॉर्डमध्ये शेअरहोल्डर म्हणून सूचीबद्ध नाहीत. त्यामुळे कंपनी बोर्डाच्या बाबींमध्ये त्यांचा सल्ला घेण्यास बांधिल नाही. त्याचप्रमाणे संजय कपूर यांच्या मृत्यूनंतर कंपनीने त्यांच्या आईकडून कोणतीही कागदपत्रे घेतली नाहीत, किंवा त्यांच्यावर स्वाक्षरीही घेतली नाही.
25 जुलै रोजी झालेल्या बैठकीत नवीन संचालक मंडळ सदस्याची नियुक्ती करण्यात आल्याचं सोना कॉमस्टार कंपनीकडून सांगण्यात आलं. संजय कपूरची पत्नी प्रिया सचदेव कपूर यांचा गैर-कार्यकारी संचालक म्हणून समावेश करण्यात आल्याचं कंपनीने सांगितलं. संजय कपूरच्या आईने ही बैठक होऊ नये अशी मागणी केली होती. त्यावर कंपनीने सांगितलं की 24 जुलै रोजी रात्री उशिरा राणी कपूर यांचं पत्र त्यांना मिळालं होतं. कायदेशीर सल्ला घेतल्यानंतर कंपनीने निर्णय घेतला की ही बैठक पुढे ढकलण्याचं कोणतंही कारण नाही. 2016 मध्ये करिश्मा कपूरला घटस्फोट दिल्यानंतर संजयने 2017 मध्ये मॉडेल प्रिया सचदेवशी लग्न केलं होतं.