Mumbai : झोपडपट्टीत राहणाऱ्याला १० कोटींची GSTची नोटीस, नावावर कंपनी अन् कोट्यवधींची उलाढाल; तरी त्याला माहितीच नाही
esakal July 29, 2025 12:45 AM

मुंबईत विक्रोळी परिसरात झोपडपट्टीत राहणाऱ्या एका व्यक्तीला १० कोटींची जीएसटी नोटीस आली आहे. झोपडपट्टीत दहा बाय दहाच्या खोलीत राहणाऱ्या व्यक्तीला कोट्यवधींची जीएसटी नोटीस आल्यानं खळबळ उडाली आहे. प्रत्यक्षात एका लहानशा खोलीत ते राहत असले तरी त्यांच्या नावे कागदोपत्री कंपनी आहे. त्यावरून कोट्यवधींची उलाढाल होत असल्यानं ते व्यापारी म्हणून नोंद झालेत. जीएसटी नोटीस आल्यानंतर नेमकं काय घडलंय हे त्या व्यक्तीला माहितीच नाही. यातून आता जीएसटी घोटाळा समोर आला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, विक्रोळीत संतोष विठ्ठल लोंढे हे झोपडपट्टीतील एका खोलीत राहतात. त्यांच्या नावावर संतोष एंटरप्रायजेस ही खोटी कंपनी सुरू केली गेलीय. त्यासाठी परस्पर आधार कार्ड आणि पॅन कार्डचा गैरवापर कऱण्यात आलाय. या कंपनीचं रजिस्ट्रेशन मीरा रोड इथल्या पत्त्यावर केलंय. पण प्रत्यक्षात त्या पत्त्यावर अशा कंपनीचं कोणतंही ऑफिस नाही.

तुम्ही कोण? विचारताच पंचायत सचिवावर भडकले आमदार; म्हणाले, इंग्लंडवरून आलायस का? अख्खा भारत मला ओळखतो

संतोष एंटरप्रायजेस या ऑफिस नसलेल्या कंपनीची उलाढाल मात्र तब्बल ६१.५ कोटी इतकी दाखवण्यात आलीय. त्यावर १०.०२ कोटी रुपयांच्या कराचा समावेश आहे. हा कर न भरल्यानं एमजीएसटी आणि सीजीएसटी कायद्यानुसार संतोष लोंढे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फसवणूक करून मिळवलेलं इनपुट टॅक्स क्रेडिट ५ कोटींपेक्षा अधिक असल्यानं हा गंभीर आणि अजामीनपात्र गुन्हा ठरला आहे.

दरम्यान, संतोष लोंढे यांची कागदपत्रं महेश कांबळे आणि राहुल पटेल या दोघांनी घेतली होती. त्यांनीच बनावट कंपनी त्या कागदपत्रांच्या आधारे बनवली. संतोष लोंढे यांना याबाबत काहीच कल्पना नाही. त्या दोघांचाही शोध आता पोलीस घेत आहेत.

Pranjal Khewalkar : खराडी रेव्ह पार्टी प्रकरणी मोठी अपडेट, प्रांजलसह अटक केलेल्यांचे ब्लड रिपोर्ट आले समोर

जीएसटी चुकवण्यासाठी अशा प्रकारे बनावट कंपनी स्थापन करून कर चुकवेगिरी केली जात असल्याचं आता समोर येत आहे. मात्र सामान्य माणसाची कागदपत्रे वापरून त्यांना अडचणीत आणलं जात आहे. यामुळे सामान्य माणसाला कायद्याच्या कचाट्यातून कोण वाचवणार आणि चोरट्यांना कोण पकडणार असा प्रश्न विचारला जात आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.