पुणे : मगरपट्टा चौकातील महापालिकेचे (कै.) अण्णासाहेब मगर प्रसूतिगृह केवळ नावालाच आहे. पुरेशा सुविधा मिळत नसल्याने नवीन इमारतीमध्ये प्रस्तावित प्रसूतिगृह अद्यापही सुरू झालेले नाही. जुन्या इमारतीचे बांधकाम धोकादायक झाले आहे. गरज असतानाही या इमारतीची डागडुजी होत नसल्याने डॉक्टर, सेवक, कर्मचारी व रुग्णांना भीतीच्या छायेत वावरावे लागत आहे.
या दवाखान्यात उपचारासाठी दररोज येणाऱ्या विविध प्रकारच्या रुग्णांची संख्या सुमारे साडेतीनशे ते चारशे इतकी आहे. त्यात श्वान दशांच्या रुग्णांचे प्रमाण दररोज चाळीस ते पन्नास इतके आहे. मात्र, त्या तुलनेत येथे डॉक्टर व कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी आहे. दवाखाना प्रसूतिगृह म्हणून नावाजलेला असतानाही येथे लहान मुलांचे डॉक्टर उपलब्ध नाहीत.
तसेच कायमस्वरूपी चिकित्सकही येथे नाही. त्यामुळे या ठिकाणी केवळ नैसर्गिक प्रसूती होत आहे. इतर अवघड प्रसूतीसाठी महिलांना सोनवणे रुग्णालयात पाठवले जाते. येथील मुख्य व जुन्याच इमारतीमध्ये दवाखाना सुरू आहे. ही इमारत नादुरुस्त झाली असून भिंतीचे सिमेंट ढासळत आहे. छतावर गवत व झुडपे वाढली आहेत. आवारात पाणी साठत आहे. रुग्णांना रुग्णालयात जाताना कसरत करावी लागत आहे.
येथे प्रसूतीसाठी येणाऱ्या गोरगरीब महिलांना योग्य तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळत नाही. महिलांना दुसऱ्या रुग्णालयात जावे लागते. लहान मुलांचे डॉक्टर उपलब्ध नसल्याने अनेक गरीब पालकांना इतरत्र धावाधाव करावी लागते.
- ॲड. के. टी. आरू पाटील, हडपसर