Raghuram Rajan: ऑटोमेशनमुळे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर धोक्यात; राजन यांनी दिला इशारा, भारतासाठी नवा विकासमार्ग कोणता?
esakal July 29, 2025 01:45 AM
  • रघुराम राजन यांनी भारताला ‘पुढचा चीन’ होण्याचा विचार सोडून देऊन सेवाक्षेत्र आणि कौशल्य विकासावर लक्ष केंद्रीत करण्याचा सल्ला दिला.

  • उत्पादन क्षेत्रात ऑटोमेशन आणि राष्ट्रवादामुळे कमी कौशल्य असणाऱ्या नोकऱ्या कमी होत आहेत, त्यामुळे केवळ मॅन्युफॅक्चरिंगवर अवलंबून राहणं धोकादायक ठरेल.

  • भारताने उच्च मूल्य सेवा आणि लॉजिस्टिक्स, ट्रक ड्रायव्हिंग, प्लंबिंगसारख्या कमी कौशल्याच्या सेवांना चालना देऊन नोकऱ्या निर्माण कराव्यात.

  • Raghuram Rajan Warns India: भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) माजी गव्हर्नर आणि प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ रघुराम राजन यांनी एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे. राजन यांनी स्पष्ट केलं आहे की, भारताने उत्पादन क्षेत्रात ‘पुढचा चीन’ होण्याची महत्वाकांक्षा ठेवण्याऐवजी सेवाक्षेत्र आणि कौशल्य विकासावर जास्त लक्ष केंद्रीत करायला हवं.

    एका मुलाखतीत राजन म्हणाले, “जगातील सध्याची परिस्थिती, राष्ट्रवाद आणि तंत्रज्ञानामुळे स्वस्त मजुरीवर आधारित मोठ्या प्रमाणात उत्पादन (मॅन्युफॅक्चरिंग) करून चीनसारखी प्रगती करणे आता शक्य नाही. जगात आणखी एका ‘चीन’साठी जागा उरलेली नाही.”

    त्यांनी स्पष्ट केलं की, आज उत्पादन क्षेत्र झपाट्याने ऑटोमेशनकडे वळत आहे. असेंब्लीसारखी कमी कौशल्याची कामं आता मशिन्स करत आहेत. “कंपन्यांना अशा लोकांची गरज आहे जे मशीन चालवतील, सांभाळतील आणि दुरुस्त करतील – फक्त मॅन्युअल काम करणाऱ्यांची गरज कमी होत आहे,” असे राजन म्हणाले.

    राजन यांच्या मते, भारताने रोजगारासाठी केवळ मॅन्युफॅक्चरिंगवर अवलंबून राहू नये. वियतनाम आणि चीनसारखे देश आधीच कमी वेतन आणि मजबूत इन्फ्रास्ट्रक्चरमुळे आघाडीवर आहेत. “सर्व देश आता स्वतःचा छोटा उत्पादन उद्योग उभा करण्यावर भर देत आहेत, त्यामुळे उत्पादन क्षेत्रातून जास्त नोकऱ्यांची अपेक्षा करणं चुकीचं ठरेल,” असा इशाराही त्यांनी दिला.

    भारताने कुठे लक्ष द्यायला हवं?

    राजन यांच्या मते, भारताची अर्थव्यवस्था6 ते 6.5% दराने वाढत आहे, जी आता पुरेशी नाही. “या गतीने भारत श्रीमंत देश होऊ शकणार नाही,” असेही राजन म्हणाले.

    त्यांनी सुचवलं की, भारताची ताकद जिथे आहे – म्हणजे उच्च मूल्य असलेल्या सेवा (High-Value Services) आणि सर्व्हिस एक्स्पोर्ट्स – तिथे अधिक लक्ष द्यायला हवं. भारत सध्या जागतिक सेवा निर्यातीच्या 4.5% वर आहे. हा सेक्टर सर्वांना नोकरी देऊ शकत नसला तरी तो भविष्याच्या प्रगतीसाठी महत्त्वाचा आहे.

    एनएसडीएल'चा आईपीओ कसा आहे

    यासोबतच, कमी कौशल्याच्या घरगुती सेवा – जसे की लॉजिस्टिक्स, ट्रक ड्रायव्हिंग, प्लंबिंग आणि दुरुस्ती – यामध्ये प्रशिक्षण देऊन लाखो नोकऱ्या निर्माण करता येतील. “जिथे नोकरी मिळेल तिथे काम करा, आणि जिथे नोकरी निर्माण करता येईल तिथे संधी निर्माण करा,” असा सल्ला राजन यांनी दिला.

    ‘भारताने आपली ताकद ओळखावी’

    राजन म्हणाले, “भारत जी-20 मधील सर्वात वेगाने वाढणारा देश आहे, पण प्रतिव्यक्ती उत्पन्नाच्या बाबतीत सर्वांत गरीब देशांपैकी एक आहे. ही परिस्थिती बदलणं अत्यावश्यक आहे.”

    त्यांनी सांगितलं की, भारतानेबदलत्या जागतिक परिस्थितीनुसार आपली धोरणं बदलायला हवीत. “फक्त उत्पादनावर अवलंबून राहून चालणार नाही. ‘पुढचा चीन’ होण्याची स्वप्नं सोडा आणि भारताने स्वत:च्या ताकदीवर आधारित, नवीन संधीं शोधायला हवी,” असा त्यांचा सल्ला होता.

    Premium |Property Sale : घर विकताय? भांडवली लाभ कराबद्दल जाणून घ्या! FAQs

    1. भारताला ‘पुढचा चीन’ का होता येणार नाही? (Why can’t India become the next China?)
    जगात स्वस्त मजुरीवर आधारित मोठ्या प्रमाणातील उत्पादनाला जागा नाही. मॅन्युफॅक्चरिंग झपाट्याने ऑटोमेशनकडे वळत आहे आणि राष्ट्रवादामुळे सर्व देश स्वतःचा उद्योग उभा करत आहेत.

    2. रघुराम राजन यांनी काय सुचवलं? (What did Raghuram Rajan suggest?)
    भारताने उच्च मूल्य सेवा, सेवा निर्यात (Service Exports) आणि कमी कौशल्याच्या सेवांवर (जसे लॉजिस्टिक्स, प्लंबिंग) जास्त भर द्यावा, ज्यामुळे रोजगारनिर्मिती होईल.

    3. भारताच्या सध्याच्या आर्थिक वाढीबाबत त्यांचे मत काय आहे? (What is Rajan’s view on India’s current economic growth?)
    ६-६.५% वाढीचा वेग पुरेसा नाही; या गतीने भारत श्रीमंत देश होणार नाही. धोरणं बदलून नवीन संधींचा लाभ घ्यावा लागेल.

    © Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.