मोठी बातमी! ठाकरे बंधू एकत्र आल्यास काय? महायुतीचा प्लॅन बी समोर, मुंबई जिंकण्यासाठी काय करणार?
Tv9 Marathi July 29, 2025 05:45 AM

Local Body Election : राज्यात लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची घोषणा होणार आहे. त्यामुळे सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. युती आणि आघाडीचं गणित जुळवलं जात आहे. मुंबई, ठाणे, पुणे यासारख्या महत्त्वाच्या महापालिकांची निवडणूकही याच काळात होणार आहे. दरम्यान या निवडणुकीसाठी मनसेचे प्रमुख राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दोन्ही बंधू एकत्र येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. असे असतानाच आता दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तर महायुतीचा प्लॅन बी तयार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ठाकरे बंधूंना रोखण्यासाठी महायुतीने जाळं टाकण्यास सुरुवात केली आहे.

ठाकरे बंधूसाठी महायुतीने नो रिस्क धोरण

ठाकरे बंधू एकत्र आल्यास महायुतीचा प्लॅन बी तयार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ठाकरे बंधूसाठी महायुतीने नो रिस्क धोरण स्वीकारले आहे. प्लॅन बी नुसार प्रमुख महापालिका निवडणुकीत महायुती म्हणून लढवली जाण्याची शक्यता आहे. तसेच ठाकरे बंधू एकत्र आल्याने त्यांची ताकद वाढणार आहे. असे असताना आपल्या मतांचे विभाजन होऊ नये यासाठी महायुतीकडून विशेष काळजी घेतली जाणार आहे. विशेष म्हणजे मुंबईसह प्रमुख महानगर पालिका एकत्र लढणार लढण्याचा प्रयत्न महायुतीकडून केला जाणार आहे.

मुंबई जिंकण्यासाठी विशेष प्लॅन

ठाकरे बंधूंना फायदा होऊ नये यासाठी महायुती प्रमुख महानगर पालिका लढवण्यावर भर देत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मुंबईची महानगरपालिका केंद्रस्थानी असणार आहे. मुंबई जिंकण्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. मुंबई काबीज करण्याच्या उद्देशानेच ठाकरे बंधूदेखील एकत्र येण्याची तयारी करत आहेत. हीच बाब लक्षात घेता मुंबई जिंकण्यासाठी ज्या महायुतीच्या नेत्यांना या शहराची माहिती आहे, त्यांच्याकडेच महापालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी देण्यात येणार आहे.

ठाकरेंच्या कारभाराची पोलखोल केली जाणार

विशेष म्हणजे ज्या ठिकाणी महायुतीत वाद असतील ते वाद येत्या महिन्याभरात मिटवून निवडणुकीच्या तयारीला महायुती सुरुवात करणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यानच्या काळात मुंबई पालिकेवर गेली अनेक वर्ष सत्तेत असलेल्या ठाकरेंच्या कारभाराची महायुतीकडून पोलखोल केली जाणार आहे. मुंबईतल्या प्रत्येक वॉर्डची जबाबदारी महायुतील्या आमदारांकडे देणार येणार आहे.

जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न

महापालिका निवडणूक जिंकायची असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. सध्या सणासुदींचा काळ सुरू झाला आहे. या काळात लोक एकत्र जमतात. उत्सव साजरा करतात. हीच बाब लक्षात घेता महायुती सणासुदीमध्ये लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे. कोकणी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी गणेशोत्सव काळात मोफत ट्रेन्स, एसटी बसेसची सुविधा महायुतीच्या नेत्यांकडून केली जाणार आहे. गोविंदा पथक, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानाही महायुतीशी जोडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.