लिंबू पाणी हे एक घरगुती पेय आहे. घरी आलेल्या पाहुण्यांनाही आपण लिंबू सरबत देत असतो. मात्र यापलीकडे वजन कमी करण्यासाठी अनेकांना रिकाम्या पोटी लिंबू पाणी घेण्याची सवय असते. सकाळी उपाशीपोटी कोमट पाण्यात लिंबू घालून अनेक जण पितात. मात्र तुम्हाला माहित आहे का रिकाम्या पोटी लिंबू पाणी घेण्याचे फायदे असतील तरीही ते काहींना घातक ठरू शकते. त्यामुळे रिकाम्यापोटी लिंबू पाणी घेताना काही काळजी घेणे गरजेचे आहे.
लिंबू पाण्याचे फायदे
लिंबू पाण्यात व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, जे शरीराला अनेक प्रकारे फायदेशीर ठरते. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत होते. त्वचा निरोगी आणि चमकदार बनते. तसेच सकाळी लिंबू पाणी घेतल्याने उर्जेची पातळी चांगली राहते. मात्र ज्यांना पोटाच्या समस्या, दातांच्या समस्या असतात त्यांनी लिंबू पाणी घेणे टाळावे.
याचे कारण म्हणजे लिंबूमध्ये जास्त प्रमाणात सायट्रिक अॅसिड असते जे काही लोकांसाठी हानिकारक ठरू शकते. यामुळे छातीत जळजळ आणि ॲसिडिटी वाढू शकते. तसेच दातांच्या इनॅमलवर परिणाम होतो, ज्यामुळे दात कमकुवत आणि संवेदनशील होऊ शकतात.
रिकाम्या पोटी लिंबू पाणी कोणी पिऊ नये?
ज्या लोकांना कायम पोटात अल्सर, ॲसिडिटी, छातीत जळजळ, पोट फुगणे असा त्रास होतो त्यांनी रिकाम्या पोटी लिंबू पाणी घेणे टाळावे. लिंबूमधील तीव्र आम्ल पोटाच्या आतील भागाला अधिक संवेदनशील बनवू शकते.
दातांचा त्रास:
जर तुम्हाला दातांच्या समस्या असतील तर लिंबू पाणी घेणे टाळावे. त्यामुळे तुमच्या दातांना आणखी नुकसान होऊ शकते.
मूत्रपिंड आणि रक्तदाब:
मूत्रपिंडाचा आजार किंवा कमी रक्तदाब असलेल्या लोकांनी रिकाम्या पोटी लिंबू पाणी घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
या गोष्टी लक्षात ठेवा
जर तुम्हाला लिंबूपाणी पिण्याची इच्छा असेल तर कोमट पाण्यात अर्धे लिंबू टाकून घ्यावे. लिंबूचे प्रमाण हे कमी ठेवा. लिंबूपाणी पिल्यानंतर स्वच्छ पाण्याने तोंड धुवा ज्यामुळे दातांना नुकसान होणार नाही. ज्यांना कमी रक्तदाब किंवा किडनीचा त्रास आहे त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच ते सेवन करावे. जर तुम्हाला अॅसिडिटीची समस्या असेल तर रिकाम्या पोटी लिंबूपाणी पिणे टाळावेच. या समस्या असलेल्या लोकांनी योग्य वेळी, योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने लिंबू पाणी घ्यावे.