Mega River Flood: पुरामुळे अडकले होते बीड जिल्ह्यातील भाविक; काजळेश्वर मठ देवस्थानात घेतला आसरा
esakal July 29, 2025 05:45 AM

शिरजगावकसबा : बैतूल जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे मेघा नदीला मोठा पूर आला. या पुरामुळे देऊरवाडा काजळेश्वर देवस्थानात दर्शनासाठी आलेले बीड जिल्ह्यातील भाविक रात्रभर देवस्थानामध्येच मुक्कामी राहिले.

पुराचे पाणी कमी झाल्यानंतर रविवारी (ता.२७) रोजी सकाळी गावी परतले. याबाबत माहिती मिळताच प्रभारी तहसीलदारांनी रविवारी काजळेश्वर देवस्थानला भेट दिली व प्रशासनाच्या वतीने त्यांना पत्र देऊन येथे भाविकांना थांबण्यास मनाई केली आहे.

शनिवार २६ जुलै रोजी शिरजगावकसबा येथून वाहनाऱ्या मेघा नदीला मोठा पूर आला होता. मात्र या नदीवर पूल नसल्यामुळे देऊरवाडा येथील काजळेश्वर देवस्थानात आलेल्या बीड जिल्ह्यातील भाविकांना त्यांच्या गावी जाता आले नाही. त्यामुळे त्यांना रात्रभर मुक्कामी राहावे लागले.

तथापि, याबाबत माहिती मिळताच चांदूरबाजारचे प्रभारी तहसीलदार श्री. तिवारी, मंडळ अधिकारी परवेज पठाण व तलाठी श्री. मनवर यांनी रविवारी (ता. २७) देऊरवाडा संगम याठिकाणी मेघा नदीच्या बाजूला असलेल्या काजळेश्वर देवस्थानला भेट दिली. त्याठिकाणी श्री. करंजेकर महाराज यांची भेट घेऊन चांदूरबाजार तहसील प्रशासनाच्यावतीने त्यांना पत्र दिले. सद्यःस्थितीत पावसाळ्याचे दिवस असल्याने मेघा नदीला कधीही पूर येऊ शकतो. यामुळे देवस्थानमध्ये भाविकांना दर्शनार्थ थांबू देऊ नये, जीवितहानी झाल्यास प्रशासन जबाबदार राहणार नाही, असे त्या पत्रात नमूद केलेले आहे.

Buldhana Crime: खामगावात तरुणाला बेदम मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल, आज वंचितकडून खामगाव शहर बंदची हाक नदीवर पूल बांधण्याची मागणी

या मठामध्ये जिल्ह्यासह इतर राज्यातील महानुभाव पंथाचे भाविक दर्शनासाठी येतात. काही थोड्या भाविकांना तात्पुरती येथे राहण्याची व्यवस्था आहे, असे करंजेकर महाराजांनी प्रशासनाला सांगितले आहे. परंतु याठिकाणी नदीला पूल नसल्यामुळे इतर राज्यातील भाविकांना दर्शनार्थ येता येत नाही, ही खंत करंजेकर महाराजांनी बोलून दाखवून नदीवर पूल बांधण्याची मागणी केली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.