बावडा, ता. २८ : ‘‘नीरा भीमा कारखाना आगामी २५ व्या गळीत हंगामामध्ये सहा लाख टन उसाचे गाळप करणार आहे. गाळपाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज आहे. सध्या आगामी गळीत हंगामासाठी कारखान्यातील मशिनरीची कामे प्रगतीपथावर आहेत. त्यामुळे आगामी गळीत हंगामात शेतकऱ्यांनी सर्व ऊस कारखान्यास देऊन सहकार्य करावे,’’ असे आवाहन कारखान्याच्या अध्यक्षा भाग्यश्री पाटील यांनी केले.
शहाजीनगर येथे रविवारी (ता २७) नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याच्या आगामी ऊस गळीत हंगाम २०२५-२६ साठी बसविण्यात येणाऱ्या मिल रोलरचे पूजन राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व कारखान्याच्या अध्यक्षा भाग्यश्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
नीरा भीमा कारखान्याची प्रतिदिनी सुमारे ६५०० टन ऊस गाळप क्षमतेची ऊस तोडणी, वाहतूक यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाली आहे. आगामी गाळपाचे उद्दिष्ट पूर्ण करणेसाठी सर्वांनी प्रयत्नशील राहावे व सहकार्य करावे, असे आवाहन पाटील यांनी केले. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष दादासाहेब घोगरे, लालासाहेब पवार, विलास वाघमोडे, ॲड. कृष्णाजी यादव,उमेश पाटील दत्तू सवासे, प्रताप पाटील, प्रकाश मोहिते, संजय बोडके, राजकुमार जाधव, विजय घोगरे, सुभाष गायकवाड, राजेंद्र देवकर, महेशकुमार शिर्के, आनंदराव बोंद्रे, रामचंद्र नाईक, राहुल कांबळे, संगीता पोळ, कल्पना शिंदे उपस्थित होते. प्रारंभी कार्यकारी संचालक एन. ए. सपकाळ यांनी स्वागत केले.
ऊस पिकासाठी एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञानाचा वापराने ऊस उत्पादनामध्ये मोठी वाढ, खत व पाणी बचत होत आहे. संभाव्य किडी-रोग व इतर माहिती शेतकऱ्यांना मोबाईलवर मिळणार आहे. त्यामुळे नीरा भीमा कारखान्याच्या कार्यक्षेत्रात शेतकऱ्यांच्या शेतात ऊस पिकामध्ये एआय तंत्रज्ञानाचा वापर केला आहे.
-भाग्यश्री पाटील, नीरा भीमा साखर कारखाना
00849