पावसाळी अधिवेशनात आजचा दिवस वादळी ठरला. पुलवामा, पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूर तर काल या हल्ल्यातील दहशतवाद्यांना यमसदनात पाठवल्याची घटना यावरून लोकसभेत रणकंदन दिसले. विरोधक सरकारला घेरण्याच्या प्रयत्नात असतानाच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. त्यांच्या अनेक मुद्यांचे खंडन पुराव्यासह केले. अमित शाह यांनी काँग्रेसच्या काळात विशेषतः देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या काळातील धोरणांवरुन काँग्रेसला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला.
पंडित नेहरूंवर पुन्हा फोडले खापर
पाकव्याप्त काश्मीर आणि अक्साई चीन या समस्या हे माजी पंतप्रधान पंडित नेहरू आणि काँग्रेस यांच्यामुळेच तयार झाल्याचे पुन्हा एकदा केंद्रीय गृहमंत्र्यांनी अधोरेखित केले. चीनला संयुक्त राष्ट्रांचा संस्थापक सदस्यत्व मिळण्याचे कारण पंडित नेहरू असल्याचे शाह म्हणाले. 1962 च्या युद्धाचा उल्लेख करत 30 हजार वर्ग किलोमीटर आक्साई भाग चीनला दिला.
पाकव्याप्त काश्मीरचं अस्तित्वाचं कारण नेहरूच असल्याचे गृहमंत्री म्हणाले. सरदार वल्लभभाई पटेल यांनी 1948 साली नकार दिल्यावरही नेहरूंच्या हट्टामुळे एकतर्फी युद्ध बंदी झाली. मी इतिहासाचा विद्यार्थी आहे. जबाबदारीने सांगतो, ही समस्या फक्त नेहंरूमुळेच आहे. नेहरूच त्यासाठी जबाबदार आहे, असे गृहमंत्री म्हणाले.
खासदार कनीमोझींना करुन दिली आठवण
पाकिस्तानने हल्लाच केला नाही असं म्हणता. तुम्ही क्लीनचिट देत आहात. तुम्हाला काय अधिकार आहे बोलण्याचा. पाकिस्तानला क्लीनचिट देत आहात म्हटलं तर कनीमोझी म्हणतात आम्ही नाही दिला. पण तुम्ही ज्यांच्यासोबत बसता त्याच्या दोष तर तुमच्यावर येणार ना. चिदंबरम तुमच्या राज्यातील आहेत. तुमच्या मित्र पक्षातील आहेत. माजी गृहमंत्री होते, ते म्हणत आहेत, अशी अमित शाह यांनी आठवण करुन दिली.
तो किस्सा पुन्हा सांगितला
1962 च्या युद्धात काय झालं. 30 हजार वर्ग किलोमीटर आक्साई भाग चीनला दिला. त्यावर नेहरू सभागृहात म्हणाले की त्या भागात गवताची एक काडीही तिथे उगत नाही. त्या जागेचं काय करू. नेहरूंचं डोकं माझ्यासारखं होतं. महावीर प्रसाद त्यागी म्हणाले, तुमच्या डोक्यावरही एक केस नाही ते चीनला विकायचं का. नॉन सीरिअस टाइपचं उत्तर नेहरू त्या काळात देत होते. हा किस्सा अनेकदा सांगितला जातो. आज लोकसभेत जोरदार खडाजंगी झाल्यावर अमित शाह यांनी काँग्रेससहविरोधकांना पुन्हा त्याची आठवण करून दिली.