Shravan Month 2025: श्रावणमासाची मंगलमय सुरुवात; पहिल्या सोमवारी शिवमंदिरात गर्दी
esakal July 29, 2025 11:45 PM

नागपूर : सण-उत्सवांची रेलचेल आणि निसर्गसौंदर्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या श्रावण महिन्याला नुकतीच सुरुवात झाली आहे. ऊन-पावसाच्या खेळाने प्रसन्न झालेल्या वातावरणात श्रावणातील पहिल्याच सोमवारी शहरातील विविध शिवमंदिरांमध्ये भाविकांनी मनोभावे दर्शन घेतले. येत्या महिनाभर आता निरनिराळ्या धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे.

श्रावणात नागपंचमी, राखीपौर्णिमा, श्रीकृष्ण जन्माष्टमी यांसारख्या सण-उत्सवांची रेलचेल असते. मंगळागौरीच्या खेळांनी या उत्सवांची रंगत अधिकच वाढते. यंदाच्या श्रावण महिन्यात अनोखे योग आले असून यंदा १० वर्षांनंतर श्रावणात अंगारकी चतुर्थीचा योग आला आहे. यापूर्वी २०१५ मध्ये असा योग आला होता. तसेच, १९९८ प्रमाणे यंदाही श्रावणातील चारपैकी तीन मंगळागौरीच्या पूजेच्या दिवशी उपवासाचे दिवस आले आहेत.

विविध सणांची रेलचेल

मंगळवारी (ता. २९) नागपंचमीने या सणांची रेलचेल सुरू होणार आहे. त्यानंतर ८ ऑगस्टला नारळी पौर्णिमा, ९ ऑगस्टला रक्षाबंधन, १५ ऑगस्टला श्रीकृष्ण जन्माष्टमी, १६ ऑगस्टला गोपाळकाला आणि २२ ऑगस्टला पोळा आहे. विविध सोमवारी, तसेच शुक्रवारी सत्यनारायण पूजा, लघुरुद्र अशा धार्मिक कार्यक्रमांचेही आयोजन केले जाणार आहे.

तीन मंगळागौरी उपवासाच्या दिवशी

२९ जुलैला पहिल्या मंगळवारी, ५ ऑगस्टच्या मंगळवारी पुत्रदा एकादशी, १२ ऑगस्टला मंगळवारी अंगारकी चतुर्थी, १९ ऑगस्टच्या मंगळवारी एकादशी असे यंदा उपवासाचे दिवस आहेत. मंगळागौरीचे पूजन करणाऱ्या काही महिला उपवास करतात. पण देवतांना उपवास नसतो, त्यामुळे नेहमीप्रमाणे भोजनाचा नैवेद्य देवीला अर्पण करता येईल.

Pune News : ‘शिखंडी’चा राजस्थानात निनाद; पुण्यातील तृतीयपंथींच्या पथकाचे कावड यात्रेत दमदार वादन रक्षाबंधन अन् नारळी पौर्णिमा स्वतंत्र

सूर्यास्ताच्या आधी पौर्णिमा असते, त्यादिवशी नारळी पौर्णिमा असते. त्यामुळे ८ ऑगस्टला नारळी पौर्णिमा साजरी करावी. सुर्योदयादरम्यान असलेल्या पौर्णिमेस राखीपौर्णिमा साजरी होते. त्यामुळे ९ ऑगस्टला राखीपौर्णिमा आहे. त्या दिवशी वेळ, मुहूर्ताचे कोणतेही बंधन नसल्याने दिवसभर आपल्या वेळेनुसार रक्षाबंधन करता येईल.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.