कर्करोग आणि अंधश्रद्धा
esakal July 29, 2025 11:45 AM

- आशा नेगी, लेखिका, कॅन्सर जनजागृतीसाठी कार्यरत

ग्रामीण भागांत किंवा अनेक शहरी भागांमध्येही आजारपणाबाबत मोठ्या प्रमाणावर अंधश्रद्धा आढळतात. वेळ गेल्यावर डॉक्टरांकडे नेले जाते. आजारपणाकडे अंधश्रद्धेच्या आणि चुकीच्या समजुतींच्या चष्म्यातून पाहिलं जातं. कोणाला थोडा थकवा, दुखणं, गाठी वगैरे जाणवलं, की लोक लगेच म्हणतात, ‘अंगात आलंय’, ‘नजर लागलीये’, किंवा ‘बाहेरचं काही आहे’ अशा प्रकारचे समज अजूनही आहेत.

भ्रम, अंधश्रद्धा आणि वेळेचा अपव्यय

ग्रामीण, दुर्गम भागांतील महिलांना स्वतःच्या आरोग्यासाठी वेळ नसतो. घरकाम, शेत, मुलंबाळं सांभाळणं यामध्ये त्या स्वतःकडंच दुर्लक्ष करतात. शिवाय आरोग्यविषयक अज्ञान आणि अंधश्रद्धा यामुळे त्यांना काय गंभीर आहे, हे कळतच नाही.

एखादी बाई बारीक होत जाते, सतत थकलेली असते, अंग दुखतं; पण हे सगळं ‘साधं आजारपण’ समजून दुर्लक्ष केलं जातं. कधी कधी त्या गाठी कोणताही त्रास देत नाहीत – म्हणूनही लक्ष वेधलं जात नाही. पण आतून मात्र त्या गाठी वाढत जातात.

लाज आणि भीती

विशेषतः स्तनांमध्ये काही गाठ आढळल्यास महिला बोलायलाच घाबरतात. एकतर लाज, दुसरं ‘कोण काय म्हणेल?’ याची भीती. घरातले लोकही म्हणतात, ‘डिलिव्हरीनंतर दुधाच्या गाठी होतात, होतं असं.’ हा एक मोठा गैरसमज आहे. प्रत्येक वेळी गाठ म्हणजे दुधाच्या गाठी नाहीत. या गाठींना सुरुवातीला त्रास नसतो, त्यामुळे त्या वेळेत ओळखल्या गेल्या नाहीत, तर शरीरभर पसरतात.

तेव्हा लक्षात येतं, पण वेळ निघून गेलेली असते. अनेक ठिकाणी अजूनही कर्करोग म्हणजे ‘असाध्य आजार’, ‘मृत्यूची तयारी’, किंवा ‘नशिबाची शिक्षा’ समजली जाते. कोणाला ब्रेस्ट कॅन्सर असतो, कुणाला गर्भाशयात गाठ असते; पण त्याकडे गांभीर्यानं न पाहता, देवाधर्माच्या गोष्टी सुरू होतात. अनेकदा ना चाचणी केली जाते, ना तपासणी – आणि जेव्हा हॉस्पिटल गाठलं जातं, तेव्हा बराच वेळ हातातून निसटलेला असतो.

गावांत प्राथमिक आरोग्य केंद्रांत आणि महिलांच्या बचत गटांमधून नियमित शिबिरं घेतली गेली, तर बायकांना माहिती मिळेल की छातीची स्व तपासणी कशी करायची. स्तनांमध्ये गाठ, कडकपणा, वेदना - काहीही जाणवलं, तर लाज न बाळगता तातडीनं डॉक्टरांशी संपर्क साधणं गरजेचं आहे. डिलिव्हरीनंतर काही गोष्टी सामान्य असतात; पण प्रत्येक गाठ ‘दूधाचीच’ असते असं गृहीत धरणं चुकीचं आहे.

महिलांना मोकळेपणानं बोलता यावं, हे महत्त्वाचं आहे. कर्करोगाविषयी माहिती असणं ही गरज नाही, तर गरजेची जबाबदारी आहे. आपल्या घरातल्या, शेजारपाजारातल्या स्त्रिया आरोग्याबद्दल बोलायला घाबरत असतील, तर आपण त्यांचा आधार बनायला हवं. कारण एखाद्या मायेच्या बोलण्यानं जीव वाचू शकतो, आणि अंधश्रद्धेवर मात करता येते.

फक्त अंधश्रद्धा नाही; पण माहिती आणि सुविधा नसणं हीसुद्धा मोठी अडचण आहे. कधी कधी आजाराचं निदान उशिरा होण्यामागं फक्त अंधश्रद्धा कारणीभूत नसते, तर त्याहीपेक्षा मोठा प्रश्न असतो – सुविधा आणि माहितीचा अभाव. गावांमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रं असतात; पण ती फक्त ताप, सर्दी, किंवा सामान्य डिलिव्हरीसाठीच उपयोगी.

कर्करोगासारख्या आजारासाठी लागणाऱ्या मेमोग्राफी, स्कॅनिंग, बायोप्सी, किंवा रेडिएशन यांसारख्या चाचण्या - या सगळ्या सुविधा बहुतेक गावांमध्येच उपलब्ध नसतात. त्यासाठी मोठं रुग्णालय लागतं – जे बहुतेक वेळा शहरातच असतं. आणि खरं तर गावातल्या अनेक लोकांना ‘उपचार कुठं करायचा?’ हेच माहीत नसतं.

कोणतं रुग्णालय चांगलं, किती खर्च येईल, काय कागदपत्रं लागतील, हे काहीच माहीत नसतं. शिक्षण झालेलं असलं, तरी माहिती नसली की माणूस तिथेही अडखळतोच.या अडचणींमुळे बरेच रुग्ण घाबरतात, बिचकतात, आणि शेवटी उपचारच टाळतात. यासाठी हवी असते – सोप्या भाषेत, योग्य मार्गदर्शन देणारी माहिती.

त्यासाठी गावातल्या आरोग्य शिबिरांमध्ये मदतीनं माहितीपत्रक वाटता येईल. कर्करोग कसा ओळखायचा, लक्षणं कोणती, सरकारच्या कोणत्या योजना आहेत, कुठं उपचार मिळतो हे सगळं समजावून सांगणं ही एक मोठी मदत ठरते.

त्याचबरोबर शहरांतल्या मोठ्या रुग्णालयांमध्ये गावातून आलेल्या रुग्णांसाठी एक माहिती डेस्क हवा जिथे त्यांना योग्य मार्गदर्शन, तपासणीसाठी मदत, आणि औषधोपचारांची माहिती देईल.आणि अशा वेळी सामाजिक संस्था पुढे येतात- ज्या रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना निवारा, जेवण, आणि मानसिक आधार देतात.

आरोग्य कर्मचारी, डॉक्टर, कॅन्सरवर मात केलेले रुग्ण, आणि अनेक सामाजिक संस्था मिळून ग्रामीण भागांत जनजागृती करत आहेत. मात्र, या लढ्यात सरकारसोबतच आपण प्रत्येकानं ‘मी काही करू शकतो’ असं मानणंही गरजेचं आहे. माहितीचा अभाव भरून काढण्याची जबाबदारी केवळ शासन आणि डॉक्टरांची नसून इतर सुजाण नागरिकांचीही नैतिक जबाबदारी आहे. तुमचं एक पाऊलही कुणाचंतरी आयुष्य बदलू शकतं.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.