प्रश्न : भीती किंवा असुरक्षितता हे अहंकाराचे कारण आहे का? आणि मी माझा अहंकार कसा मोडू शकतो?
सद्गुरू : हे नेमके उलट आहे. अहंकारामुळेच भीती निर्माण होते. भीती असण्याचे कारण अहंकार हीच एक अशी गोष्ट आहे, जी दुखावली जाऊ शकते. तुमच्यामध्ये फक्त अहंकारच आहे, जो चिरडला जाऊ शकतो आणि त्याचा गैरवापर होऊ शकतो.
तुम्ही स्वतःसाठी एक मर्यादित सीमा आणि मर्यादित ओळख निश्चित केली आहे, त्यामुळे भीती हे त्याचे स्वाभाविक उत्पादन आहे. भीती ही तुमच्या मर्यादित ओळखीचे फळ आहे. जर तुम्ही ही मर्यादित ओळख काढून टाकली, तर भीतीला जागाच उरणार नाही.
जर तुम्ही खरंच पाहिले, तर तुम्हाला शारीरिक मृत्यूची भीती नाही. शरीर एक दिवस नष्ट होणार आहे फक्त हीच गोष्ट नाही, तर मुख्य मुद्दा हा आहे की ‘माझं काय होईल?’ हा जो व्यक्ती आहे, ज्याला तुम्ही ‘मी’ म्हणून समजता, ती एक स्वनिर्मित प्रतिमा आहे. तुम्हाला खरे तर शरीर गमावण्याची भीती नाही, तुम्हाला सतत ही भीती वाटते, की तुम्ही स्वतःची तयार केलेली जी प्रतिमा आहे ती गमावाल.
उदाहरणार्थ, जर आम्ही काही मार्गांनी तुमचा अपमान करण्याचा आणि तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न केला, शारीरिक नाही, तर इतर सर्व मार्गांनी, तर तुम्हाला खरेच असे वाटेल, की या स्वतःच्या प्रतिमेचा मृत्यू व्हावा. कारण सगळा त्रास सहन करण्यापेक्षा मृत्यू हे एक वरदान ठरेल, मृत्यू हा दयाळूपणा ठरेल.
शिव, योगाचे पहिले गुरू, यांचे वर्णन संहारक म्हणून केले जाते, कारण जोपर्यंत तुम्ही ही ओळख नष्ट करत नाही, जोपर्यंत तुम्ही तुमच्यासाठी आज सर्वांत मौल्यवान असलेली गोष्ट नष्ट करत नाही, तोपर्यंत त्याच्या पलीकडचे काही घडणार नाही; हाच सर्वांत मोठा अडथळा आहे. हा एक बुडबुडा आहे, ज्यातून तुम्ही बाहेर पडायला तयार नाही. तुमची भीती ही आहे, की तो फुटेल. पण त्याचवेळी, तुमच्यामध्ये असे काहीतरी आहे, जे अमर्याद होऊ पाहते आहे.
तुम्ही ज्याला अध्यात्म समजता ते एका अमर्याद बुडबुड्याबद्दल आहे. खरे तर अमर्याद बुडबुडा असे काही नसते. एकच गोष्ट आहे, ती म्हणजे बुडबुडा फोडणे. तुम्हाला हा बुडबुडा एवढा मोठा फुगवायची गरज नाही, की त्यात संपूर्ण अस्तित्व सामावेल. जर तुम्ही तो टोचला आणि फोडला, तर तुम्ही अमर्याद आहात. सर्व सीमा नाहीशा होतील.