वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याची विशेष काळजी घेतली जात आहे. वर्कलोड मॅनेजमेंट करत जितका त्रास कमी होईल तितका प्रयत्न सुरु आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षात जसप्रीत सलग सामने खेळताना दिसत नाही. त्याला आराम दिला जात आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सिडनी कसोटीनंतर बीसीसीआय त्याच्यावर विशेष लक्ष ठेवून आहे. इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी संघात त्याची निवड केली गेली. पण जसप्रीत बुमराह फक्त तीन सामने खेळणार हे स्पष्ट केलं होतं. आतापर्यंत झालेल्या चार कसोटी सामन्यापैकी तीन सामन्यात जसप्रीत बुमराह खेळला आहे. त्यामुळे पाचव्या कसोटीत खेळेल की नाही याबाबत क्रीडाप्रेमींमध्ये संभ्रम आहे. पाचव्या कसोटीपूर्वी बुमराहच्या वर्कलोडबाबत एक रिपोर्ट समोर आला आहे.
टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, जसप्रीत बुमराहला एका कसोटीत फक्त 45 ते 50 षटकं टाकण्याचा सल्ला दिला गेला आहे. पहिल्या कसोटी सामन्यात त्याने 43.4 षटकं टाकली होती. दुसऱ्या कसोटी सामन्यात लॉर्ड्सवर 43 षटकं टाकली. त्यानंतर मँचेस्टर कसोटी सामन्यात त्याने 33 षटकं टाकली. त्यामुळे त्याला कमीत कमी षटकं देण्याचा प्रयत्न दिसून येत आहे. कारण सिडनी कसोटीत त्याने सलग गोलंदाजी केली होती. त्यामुळे दुखापतग्रस्त झाला होता. पण इंग्लंड दौऱ्यात वर्कलोड मॅनेजमेंटप्रमाणे सर्व काही होत आहे. इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यापूर्वी मुख्य प्रशिक्षक गौतम याने स्पष्ट केलं की, भारताचे सर्व वेगवान गोलंदाज फिट आहेत आणि निवडीसाठी उपलब्ध आहेत. पण प्लेइंग 11 जाहीर होत नाही, तिथपर्यंत जसप्रीत बुमराहबाबत काही सांगता येत नाही.
वृत्तानुसार, बीसीसीआय निवडकर्ते आणि टीम व्यवस्थापनावर नाराज असल्याचं बोललं जात आहे. बुमराहबाबत माहिती न घेता त्याला मालिकेत घेतल्याने बीसीसीआय नाराज आहे. संघ व्यवस्थापन आणि निवडकर्त्यांनी बुमराह संपूर्ण मालिकेसाठी उपलब्ध आहे की नाही समजून घ्यायला हवं होतं. काही सामन्यांमध्ये विश्रांती आणि काही सामन्यांमध्ये सहभागी होतो, असं करू नये. बोर्डाला असे वाटते की बुमराहने स्वतःला पूर्णपणे उपलब्ध ठेवावे किंवा त्याने विश्रांती घ्यावी. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मँचेस्टर कसोटीसाठी स्वतःला उपलब्ध करून दिल्यानंतर बुमराह पाचव्या कसोटीतून बाहेर पडू शकतो.