Ahilyanagar PWD Bills : अहिल्यानगरमधील ठेकेदार हवालदिल! बिलांसाठी जीव टांगणीला; 'पीडब्ल्यूडी'कडे रोज हेलपाटे, ४६ हजार कोटींचा बोजा
esakal July 29, 2025 09:45 PM

-समीर दाणी

अहिल्यानगर: जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभागाकडे गेल्या दोन वर्षांपासून ठेकेदारांची १ हजार २३१ कोटी रुपयांची बिले थकली आहेत. विभागाने मार्च २०२५ पर्यंत केवळ ७ टक्के निधीचे वितरण केले आहे. एकट्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून बाराशे कोटींची बिले येणे बाकी आहे. प्रलंबित देयकांसाठी ठेकेदारांचे सरकार दरबारी हेलपाटे सुरू आहेत. इतकी रक्कम थकल्याने ठेकेदार हवालदिल झाले आहेत.

Success Story: 'संकटावर मात करत डॉ. आदित्य चिंचकर यांची युपीएससीत धडाकेबाज घोडदौड'; मिळवली ४० वी रँक

सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत शासकीय इमारती, रस्ते, पुलांची कामे केली आहेत. ही कामे नोंदणीकृत ठेकेदारांमार्फत केली जातात. जिल्ह्यातील ठेकेदारांनी सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारे केलेल्या कामांची संख्या मोठी आहे. गेल्या दोन वर्षांत जवळपास बाराशे कोटी रुपयांच्या कामांची बिले मिळाली नाहीत. विभागाने मार्च २०२५ पर्यंत केवळ ७ टक्के निधी वाटला आहे. ठेकेदार संघटनेने यापूर्वी वेळोवेळी आंदोलने, उपोषणे केली. मात्र, तरीही देयकांचे वितरण झाले नाही. ठेकेदारांनी बॅंक कर्ज काढून ही कामे पूर्ण केली. पोकलेन, जेसीबी, डंपर व मशिन साहित्याचे बॅंक हफ्ते थकल्याने बॅंकांच्या त्रासाला ठेकेदारांना सामोरे जावे लागत आहे.

दीड कोटीचे बिल न मिळाल्याने सांगलीतील हर्षल पाटील या तरुण ठेकेदाराने आत्महत्या केली. शासन व प्रशासनाच्या दिरंगाईमुळे तरुण व्यावसायिकाला जीव गमवावा लागला. तसा त्यांच्या नातेवाइकांचा आरोप आहे. नगरमधील ठेकेदारांचीही कोट्यवधींची बिले थकीत आहेत. त्यामुळे त्यांच्याही मनात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील ठेकेदार संघटना सांगलीतील घटनेची पुनरावृत्ती घडू नये यासाठी आक्रमक झाल्या आहेत.

४६ हजार कोटींचा बोजा

सार्वजनिक बांधकाम विभागाचे राज्याचे एकूण बजेट १८ हजार कोटी रुपयांचे आहे. मात्र, कंत्राटदारांची मार्च अखेरपर्यंत तब्बल ४६ हजार कोटींची बिल थकले आहे. नवीन कामांच्या बिलांचा यामध्ये समावेश नाही. शासनाने बजेटमध्ये पूर्वी तरतूद नसलेल्या लाडक्या योजना गेल्या वर्षी सुरू केल्या. याचा परिणाम विकासकामांची बिले थकीत ठेवण्यावर झाला असल्याचा आरोप ठेकेदार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

Success Story: शंकरबाबांची दृष्टिहीन कन्या माला झाली सरकारी अधिकारी; दत्तक कन्येला वडिलांचे नावच नाही, ममत्वही मिळालं

आमच्या कोट्यवधींच्या बिलांसाठी आम्ही वेळोवेळी आंदोलने, उपोषणे केली. मात्र, अद्यापि शासन व प्रशासन गंभीर नाही. कामे करण्यासाठी अनेकांनी बॅंकांचे कर्ज घेतले आहे. हे कर्ज थकत चालले आहे. वेळीच यावर उपाययोजना केल्या नाही, तर आमच्यावरही हर्षल पाटीलसारखी आत्महत्येची वेळ येऊ शकते.

-संजय गुंदेचा, चेअरमन, बिल्डर्स असोसिएशन.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.