संपूर्ण भारत डिजिटल घोषणा कागदावरच
esakal July 30, 2025 11:45 AM

- rat२७p५.jpg-
२५N८०२५१
फुणगुस ःयेथील निरूपयोगी टॉवर

‘डिजिटल भारत’ घोषणा कागदावरच
फुणगुस नेटवर्कविना ; नागरिक आंदोलनाच्या तयारीत
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर,ता.२९ ः संगमेश्वर तालुक्यातील फुणगुस गावात भारत संचारच्या मोबाईल टॉवरचं काम पूर्ण होऊन दोन वर्षे उलटली, तरीही हा टॉवर अद्याप निष्क्रिय अवस्थेत उभा आहे. ‘डिजिटल इंडिया’, ‘स्मार्ट व्हिलेज’, ‘ई-गव्हर्नन्स’ अशा घोषणा आणि योजना जरी जोरात सुरू असल्या, तरी प्रत्यक्षात संगमेश्वर तालुक्यातील फुणगुससारखी गावे आजही नेटवर्क अभावी संपर्क कक्षाच्या बाहेर आहेत.
सुरुवातीच्या काळात जागेअभावी टॉवरचं काम रखडलं होतं. मात्र ग्रामस्थांनी पुढाकार घेत जमीन उपलब्ध करून दिली. त्यानंतर ऑक्टोबर २०२४ मध्ये गावातील सामाजिक कार्यकर्ते सुभाष लांजेकर, साहिल खान, अफाक बोदले, परवेज नाईक यांनी लेखी निवेदन दिल्यानंतर टॉवरच्या कामाला गती मिळाली. त्या आधी फक्त खड्डा खणण्यात आला होता आणि तो खड्डा पावसात भरत देखील चालला होता. निवेदन दिल्यानंतर काही महिन्यांतच टॉवरचं बांधकाम पूर्णत्वास गेलं, पण आजही तो निष्क्रियच आहे.
फुणगुसमध्ये मोबाईल नेटवर्क नसल्यामुळे नागरिकांना अगदी किरकोळ ऑनलाइन कामांसाठी देखील तालुक्याच्या ठिकाणी जावं लागतं. घरात आजारी व्यक्ती असली तरी तात्काळ कॉल करून मदत मागवणं शक्य नाही. दैनंदिन संवादातही अडथळा निर्माण झाला आहे.
ग्रामस्थांचा आता संयम सुटत चालला आहे. जर लवकरात लवकर हा टॉवर कार्यान्वित करण्यात आला नाही, तर ग्रामस्थांकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.''संपूर्ण भारत डिजिटल'' करण्याच्या सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेत जर फुणगुससारखी गावे दोन वर्षांपासून नेटवर्कशिवाय अडकून बसत असतील, तर त्या मोहिमेला काय अर्थ? असा सवाल उपस्थित होत आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.