पुणे : पुण्याची सांस्कृतिक ओळख असलेल्या ढोल-ताशांचा गजर आता महाराष्ट्राची सीमा ओलांडून थेट राजस्थानात घुमला. देशातील पहिले तृतीयपंथींचे ढोल-ताशा पथक ‘शिखंडी’ने राजस्थानात कावड यात्रेत दमदार वादन करून उपस्थितांची मने जिंकली.
त्यांच्या कामगिरीमुळे केवळ कलेचे प्रदर्शन झाले नाही, तर सामाजिक समानता आणि तृतीयपंथी समाजाचा मुख्य प्रवाहात समावेशाचा एक मोठा संदेशही देशभरात त्यांनी पोहोचविला.पुण्यात स्थापन झालेल्या ‘शिखंडी’ पथकाने राजस्थानातील भिलवाडा जिल्ह्यातील नर्मदेश्वर महादेव लेबर कॉलनी ते हरणी महादेव मंदिरापर्यंत काढलेल्या कावड यात्रेत सहभाग घेतला.
ढोल-ताशांच्या तालावर पारंपरिक वेशभूषेत केलेले वादन उपस्थितांसाठी अविस्मरणीय अनुभव ठरला. राजस्थानमधील भाविक आणि स्थानिकांनी पथकाचे उत्स्फूर्तपणे कौतुक केले. शिखंडी ढोल-ताशा पथकाची उपाध्यक्ष मनस्वी गोईलकर म्हणाली, ‘राजस्थानमधून वादनासाठी फोन आल्यावर एक क्षणासाठी विश्वासच बसला नाही.
पथक सुरू करताना मी समानतेच्या दिशेने टाकलेले पाऊल आता प्रत्यक्षात फळ देत असल्याचे जाणवले. ३० वादकांना घेऊन आम्ही राजस्थानकडे निघालो. तिथे ढोल-ताशा वाजवण्याची संधी मिळणे आमच्यासाठी मोठी गोष्ट होती. आपल्याला अनेकदा समाजात वेगळ्या नजरेने पाहिले जाते. मात्र, तेथील लोकांनी आम्हाला भरभरून प्रेम दिले. आमच्या कलेचे मनापासून कौतुक केले. आमचे वादन स्वीकारले, याचा अभिमान आहे’’
Khadakwasla Dam: खडकवासलातून वाढविला विसर्ग; दुसऱ्या दिवशीही नागरिकांना सतर्कतेचा इशाराआम्ही जेव्हा ढोल-ताशा वाजवत यात्रेतून जात होतो, तेव्हा अनेकांनी प्रोत्साहन दिले. काही जणांनी तर आमच्याबरोबर नाचायलाही सुरुवात केली. ही आमच्यासाठी खूप भावनिक आणि प्रेरणादायी गोष्ट होती. आम्ही समाजाचा एक भाग आहोत. आम्हीही काहीतरी खास करू शकतो, हे या निमित्ताने लोकांना दाखवून देता आले, याचा मला खूप आनंद आहे.
- संगीता तांबे, खजिनदार, शिखंडी ढोल-ताशा पथक