रशियात आज भूकंपाचे मोठे, तीव्र धक्के बसले. रशियाच्या कामचटका द्वीपकल्पात हा भूकंप झाला. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 8.8 इतकी मोजली गेली असून हे धक्के इतके जोरदार होते की तिकडे बरंच काही हादरलं. रशियामधून येणारे अनेक फोटो आणि व्हिडिओ देखील तेथील भयानक परिस्थिती दर्शवत आहेत. एवढंच नव्हे तर जपान आणि अमेरिकेव्यतिरिक्त, भूकंपाचा परिणाम न्यूझीलंड आणि इंडोनेशियामध्येही दिसून आला आणि तेथे त्सुनामीचा इशारा जारी करण्यात आला आहे. काही ठिकाणी त्सुनामीचा परिणाम दिसू लागला आहे.
रशियाच्या कामचटका द्वीपकल्पाजवळ8.0 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप झाला आणि जपानसाठी त्सुनामीचा इशारा देण्यात आला असे जपानच्या हवामान विभागाने बुधवारी सांगितलं. की भूकंप सकाळी 8:25 वाजता झाला आणि त्याची सुरुवातीची तीव्रता 8.0 इतकी नोंदवली गेली. एजन्सीने जपानच्या पॅसिफिक किनाऱ्यावर 1 मीटर पर्यंत त्सुनामीचा इशारा देखील जारी केला. नंतर तो सुधारित करून 8.8 इतका करण्यात आला.
भूकंपाचे अनेक भयानक व्हिडिओ समोर
भूकंपाचे केंद्र रशियातील पेट्रोपाव्लोव्स्क-कामचत्स्कीपासून 133 किलोमीटर आग्नेयेस 74 किलोमीटर खोलीवर होते, असे युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हे (USGS) ने सांगितलं. द्वीपकल्पात झालेल्या मोठ्या भूकंपात आत्तापर्यंत कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे कोणतेही वृत्त नाही. पण ज्या पद्धतीने या भूकंपाचे व्हिडिओ समोर आले आहेत ते खूपच भयावह आहेत. व्हिडिओमध्ये अनेक इमारती हादरताना दिसत आहेत आणि अनेक ठिकाणी नुकसान होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
रशियातील कामचटका येथील एका घराच्या आतील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, तिथे भूकंपाच्या तीव्र धक्क्यांनी इमारत तर हादरलीच पण घरातील फर्निचरही प्रचंड हलत होतं.
रशियामध्ये त्सुनामीच्या लाटा
रशियाच्या पॅसिफिक किनाऱ्यावरील कामचटका प्रदेशात आलेल्या पहिल्या त्सुनामी लाटांचे फोटो आणि व्हिडिओ देखील समोर आले आहेत. भूकंपामुळे समुद्राची पातळी लक्षणीयरीत्या वाढली. त्यामुळे किनारी शहरांच्या इमारतींमध्ये पाण्याच्या पातळीत वाढ दिसून आली.
जपानच्या NHK टेलिव्हिजननुसार, जपानच्या चार प्रमुख बेटांपैकी सर्वात उत्तरेकडील बेट होक्काइडोपासून सुमारे 250 किलोमीटर अंतरावर भूकंप झाला आणि त्याचा धक्का फारच कमी जाणवला. USGC च्या सांगण्यानुसार, हा भूकंप 19.3 किलोमीटर खोलीवर झाला. भूकंपाची तीव्रता 8.7 होती असे सुरुवातीच्या अहवालानंतर यूएसजीसीने सांगितलं.
कामचटकावर झालेल्या परिणामाबद्दल रशियाकडून त्वरित कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही. अलास्का येथील राष्ट्रीय त्सुनामी चेतावणी केंद्राने अलास्कन अलेउशियन बेटांच्या काही भागांसाठी तसेच कॅलिफोर्निया, ओरेगॉन, वॉशिंग्टन आणि हवाईसह पश्चिम किनारपट्टीच्या काही भागांसाठी त्सुनामीचा इशारा जारी केला आहे. या इशाऱ्यात अलास्काच्या किनारपट्टीचा मोठा भाग तसेच पॅनहँडलचा काही भाग देखील समाविष्ट आहे.
न्यूझीलंड आणि इंडोनेशियातही त्सुनामीचा अलर्ट
द गार्डियनच्या वृत्तानुसार, न्यूझीलंडच्या राष्ट्रीय आपत्कालीन व्यवस्थापन संस्थेने (NEMA) रशियन किनाऱ्याजवळ झालेल्या मोठ्या भूकंपानंतर किनारपट्टीवर शक्तिशाली आणि अनियमित समुद्री प्रवाह आणि मोठ्या लाटा येण्याचा इशारा दिला आहे. अशा लाटा धोकादायक असू शकतात असा इशारा एजन्सीने दिला असून पोहणारे, सर्फर, मच्छीमार आणि किनारपट्टीच्या पाण्यात किंवा जवळ राहणाऱ्या लोकांना दूर राहण्यास सांगितले आहे.
त्याचप्रमाणे इंडोनेशियामध्येही त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. इंडोनेशियाच्या भूभौतिकशास्त्र एजन्सीने बुधवारी दुपारी रशियाच्या किनाऱ्यावर 8.7 तीव्रतेच्या भूकंपानंतर देशाच्या काही भागात 0.5 मीटरपेक्षा कमी उंचीच्या त्सुनामीच्या लाटा धडकू शकतात असा इशारा जारी केला आहे.
कामचटकामध्ये झाला होता 9 रिश्टर स्केलचा भूकंप
पॅसिफिक महासागराच्या जवळ असलेले जपान हे जगातील सर्वात जास्त भूकंपप्रवण देशांपैकी एक आहे. जुलैच्या सुरुवातीला, कामचटका जवळील समुद्रात पाच मोठे भूकंप झाले – त्यापैकी सर्वात मोठा भूकंप 7.4 तीव्रतेचा होता. सुमारे 2 लाख लोकसंख्या असलेल्या पेट्रोपाव्लोव्स्क-कामचत्स्की शहराच्या पूर्वेस 20 किलोमीटर खोलीवर आणि 144 किलोमीटर अंतरावर सर्वात मोठा भूकंप झाला होता.
तर यापूर्वी 4 नोव्हेंबर 1952 साली रशियातील कामचटकामध्ये 9 रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता, परंतु हवाईमध्ये 9.1 मीटर उंच लाटा असूनही, कोणतीही जीवितहानी झाली नाही.