''वाघाच्या मावशी''ला आपत्तीत साथ
esakal July 31, 2025 06:45 AM

‘वाघाच्या मावशी’ला आपत्तीत साथ
ठाणे पालिकेच्या आपत्ती विभागाकडून १४७ मुक्या प्राण्यांना जीवदान
पंकज रोडेकर : सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३० : आपत्ती ही केवळ माणसांपुरती मर्यादित नसते, ती मुक्या जीवांनाही तितकीच त्रासदायक ठरते. अशा वेळी कोणीतरी धावून येणे हे केवळ माणुसकीचे नव्हे, तर संवेदनशीलतेचेही प्रतीक ठरते. ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दलाने याचे जिवंत उदाहरण गेल्या सहा महिन्यांत घालून दिले आहे. ‘वाघाची मावशी’ समजल्या जाणाऱ्या ३७ मांजरीसह जवळपास शंभरहून अधिक प्राण्यांना त्यांनी धाडसी कृतीतून आपत्ती काळात जीवदान दिले.

आपत्ती कधी कोणावर आणि कशी येईल, हे काही सांगता येत नाही. आपत्ती आली की, मानव असो वा अन्य कोणताही जीव, या पशु-पक्ष्यांवर संकटाचे काळे ढग ओढवतात; मात्र अशावेळी माहिती कळताच ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दल हे विभाग मदतीचा हात पुढे करून त्या आपत्तीवर वेळीच मात करताना दिसत आहेत. २०२५ च्या वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत तब्बल १४७ मुक्या पशु-पक्ष्यांना आपत्ती विभागाने जीवदान दिले आहे. यामध्ये श्वानांसह वाघाच्या मावशीची संख्या ही शंभरच्या आसपास आहे, असे आकडेवारीवरून दिसत आहे.

वर्षाचे बारा महिने, हॅलो साहेब! आमच्याकडे झाड कोसळले आहे, मांजर अडकली आहे, श्वान सापडला, अशा स्वरूपाचे कॉल या विभागाच्या नियंत्रण कक्षात येत असतात. यंदा फक्त पावसाळ्याच्या दोन महिन्यांमध्येच तब्बल १०० वेळा फोन खणाणले आणि प्रत्येक वेळी महापालिकेच्या आपत्ती पथकाने घटनास्थळी जाऊन तत्काळ कारवाई केली. २०२५ या वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत १४७ मुक्या जीवांचे प्राण वाचवले गेले. यामध्ये रस्त्यांवर धडकी भरवणाऱ्या ४५ श्वानांचे, तसेच ‘वाघाची मावशी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ३७ मांजरींचे प्राण वाचवण्यात आले. सात माकडे, तीन गाई, २६ कावळे आणि १६ कबुतरांनाही अडकल्याच्या अवस्थेतून मुक्त करून सुरक्षित ठिकाणी सोडण्यात आले.

जीवदान मिळालेले मुकेजीव
कावळा -२६
कबुतर १६
श्वान ४५
वाघाची मावशी - ३७
गाय -०३
माकड ०७
पोपट -०२
घुबड -०२
घार-०५
बगळा- ०१
साप -०३
......
मांजरीसाठी तोडले बेसमेंटचे लॉक
नौपाडा प्रभाग समितीमार्फत थकबाकीपोटी २०२२ मध्ये जप्त केलेल्या वागळे इस्टेट येथील एका सोसायटीच्या बेसमेंटमध्ये मांजर अडकली होती. या वेळी सहाय्यक आयुक्तांच्या परवानगीनुसार बेसमेंटचे लॉक तोडून आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांकडून बेसमेंटमध्ये अडकलेल्या मांजरीची सुखरूप सुटका केली आहे. हा प्रकार नुकताच समोर आला आहे.

एखाद्या घटनेसाठी मदतीसाठी कक्षाला कॉल आल्यावर आमचे कर्मचारी आणि ठाणे अग्निशमन केंद्राचे अधिकारी आणि फायरमन मिळून घटनेच्या ठिकाणी नागरिकांची मदत करत असतात. त्यांना संकटातून बाहेर काढतात. तसेच प्राणी व पक्षी यांनाही मदत केली जाते.
यासीन एम. तडवी, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, ठाणे महापालिका.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.