घरातील देवघरात असो किंवा मंदिरात, पूजा करताना घंटी वाजवणे म्हणजे सकारात्मकताच असते. घंटी वाजवल्याशिवाय पूजा पूर्ण होत नाही. सकाळी देवपूजा करताना, आरती करताना आणि देवाला नैवद्य दाखवताना घंटी नक्कीच वाजवली जाते. देवाला प्रसाद किंवा नैव्यद्य दाखवताना घंटी वाजवणे शुभ मानलं जातं. पण पूजाघरात घंटी वाजवण्याचे काही नियम असतात. त्यामुळे पूजा करताना घंटी कधी आणि कितीवेळा वाजवावी हे जाणून घेऊयात.
पूजा कक्षात शुभ वस्तू ठेवल्या जातात. यामुळे देवी-देवता प्रसन्न राहतात. तसेच घरात सकारात्मक ऊर्जा वाहते. या शुभ गोष्टींपैकी एक म्हणजे घंटी असते. पूजागृहात किंवा मंदिरात गरुड घंटा ठेवणे सर्वात शुभ मानले जाते.
घंटी वाजवण्याचे कारण
पौराणिक ग्रंथांनुसार, वायू तत्व जागृत करण्यासाठी घंटी वाजवली जाते. वायूचे पाच मुख्य घटक आहेत. व्यान वायु, उडान वायु, समान वायु, अपान वायु आणि प्राण वायु. देवाला नैवेद्य अर्पण करताना पाच वेळा घंटी वाजवली जाते. वायू तत्वांच्या पाच वेळा घंटा वाजवली जाते आणि भोग अर्पण केला जातो. पाच वेळा घंटी वाजवल्याने देव आणि वायू तत्व जागृत होतात.तसेच मान्यतेनुसार, घंटीचा आवाज नकारात्मक ऊर्जा आणि वाईट शक्तींना दूर करतो. त्याचा आवाज घरात सकारात्मक ऊर्जा पसरवतो, ज्यामुळे मन शांत आणि आनंदी राहते.तसेच असे मानले जाते की घंटीच्या आवाजाने देवता जागृत होतात आणि भक्तांच्या प्रार्थना त्यांच्यापर्यंत पोहोचतात.
पूजागृहात घंटी कधी आणि किती वेळा वाजवावी?
हे बऱ्याच जणांना माहित नसेल की, पूजागृहात घंटी कधी आणि किती वेळा वाजवावी. तर मंदिरात किंवा आपल्या देवघरात पूजा करताना घंटी वाजवावी. असे केल्याने तुम्ही देवासमोर तुमची उपस्थिती दर्शवता असे होते. हा देखील देवाला नमस्कार करण्याचा एक मार्ग आहे. जेव्हा मंदिरात देवाची आरती केली जाते तेव्हा त्या वेळी लयबद्ध पद्धतीने घंटा वाजवणे शुभ मानले जाते.
देवाला नैवद्य अर्पण कराताना
देवाला अर्पण केलेले अन्न, पाणी, सुकामेवा, मिठाई आणि फळे यांना नैवेद्य म्हणतात. नैवेद्य सुपारीच्या पानावर ठेवून देवाला अर्पण करावा असं म्हटलं जातं. देवांना सुपारीची पाने खूप आवडतात, म्हणून त्यांना नेहमी सुपारीच्या पानांवर ठेवून अन्न अर्पण करावे. समुद्रमंथनाच्या वेळी अमृताच्या थेंबापासून सुपारीची पानांची निर्मिती झाली होती असं म्हटलं जातं. म्हणूनच देवांना ते आवडते.
घंटी कधी वाजवू नये?
रात्री कधीही घंटी वाजवू नये. ही देवतांची झोपण्याची वेळ असते. घंटेचा आवाज मंदिराच्या वातावरणात प्रतिध्वनीत होईल इतका मोठा असावा, परंतु मंदिराच्या बाहेर ऐकू येईल इतका मोठा नसावा. घंटी नेहमी उजव्या हाताने वाजवावी.
( डिस्क्लेमर : ही माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)