हिंजवडी : हिंजवडी परिसरातील वाहतूक कोंडीबाबत चोहोबाजूंनी टीका झाल्यानंतर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) आणि महाराष्ट्र औद्यागिक विकास महामंडळ (एमआयडीसी) अखेर एकत्र आले आहे. या दोन्ही विभागांच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी (ता. ३१) हिंजवडी परिसरात रस्ता रुंदीकरणासाठी सीमांकन (मार्किंग) सलग पाचव्या दिवशी सुरू ठेवले.
हिंजवडी, जयरामनगर ते ब्लू रिज सोसायटी (१२ मीटर), छत्रपती शिवाजी महाराज चौक ते भटेवरानगर (३० मीटर), मेझा नाइन चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते वाकड (३६ मीटर) या तीन रस्त्यांचे रुंदीकरण करण्यासाठी सकाळी साडेदहा ते चार वाजेपर्यंत पोलिस बंदोबस्तात सीमांकन करण्यात आले.
रस्त्यातील मिळकती व अतिक्रमणे हटवण्याचे काम पीएमआरडीए प्रशासनाकडून केले जाणार आहे. तर एमआयडीसी काही रस्त्यांचे रुंदीकरण करणार आहे. सीमांकन प्रक्रियेत लक्ष्मी चौक, विप्रो सर्कल, माण रस्ता, शिवाजी चौक ते वाकड रस्ता आणि फेज-१ या रस्त्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
हिंजवडी-माण रस्ता रुंदीकरण प्रकल्पात भूसंपादन हा महत्त्वाचा भाग आहे. यासाठी शेतकऱ्यांशी चर्चा सुरू आहे. काही जणांनी ४५ऐवजी २४ मीटर रस्ता ठेवण्याची मागणी केली आहे, ज्यावर प्रशासन विचार करत आहे.
रस्ता रुंदीकरण झालेच पाहिजे, ही आग्रही मागणी असली, तरी अतिक्रमणे व मिळकती हटविल्यानंतर त्याचा राडारोडादेखील तत्काळ हटवून ती जागा वापरत आणली पाहिजे, अन्यथा असून अडचण नसून खोळंबा अशी गत होईल. शेतकऱ्यांना तत्काळ टीडीआर, एफएसआय व आर्थिक मोबदला दिला जावा.
- वसंत साखरे, ज्येष्ठ ग्रामस्थ तथा अभ्यासक, हिंजवडी
आजच्या प्रक्रियेवेळी अधिकारी तसेच भूसंपादन सर्व्हेअर उपस्थित होत्या. सीमांकनानंतर पीएमआरडीएकडून नोटीस देऊन अतिक्रमणे व मिळकती हटवण्यात येणार आहेत.
- राजेंद्र तोतला, कार्यकारी अभियंता, एमआयडीसी