Kolhapur Politics : अजित पवारांच्या वाढदिनी कार्यक्रमात के. पी. पाटील म्हणतात, आम्ही महायुतीच्या विरोधात
esakal August 01, 2025 09:45 PM

KP Patil Statement :‘आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांसह सर्व निवडणुकांमध्ये राधानगरी आणि भुदरगड तालुक्यामध्ये सन्माननीय तोडगा निघत असेल तरच आम्ही युतीबरोबर, अन्यथा कार्यकर्ते सांगतील ती दिशा ठरवू. कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, त्यांचे वाटोळे करणार नाही,’ असे प्रतिपादन माजी आमदार के. पी. पाटील यांनी केले.

ते आज येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या कार्यकर्ता संवाद मेळाव्यात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. या मेळाव्यात पदवीधर मतदारसंघाचे संभाव्य उमेदवार म्हणून भैया माने यांच्या उमेदवारीची मागणी करणार असून, त्यांच्यासाठी अधिकाधिक मतदार नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले.

के. पी. पाटील म्हणाले, ‘अजित पवार यांनी कोल्हापूरसाठी भरभरून निधी दिलाच, परंतु त्यांच्यावर प्रेम करणारे कार्यकर्तेही तितकेच मोठे आहेत. गेल्या विधानसभेसाठी मोठी लढाई झाली. अपयश आले, मात्र लोक आमच्यासोबतच राहिले. ही आमची इथली ताकद आहे आणि या ताकदीला आगामी कोणत्याही निवडणुकीत तडा जाऊ दिला जाणार नाही. आम्हाला सन्मानाची तडजोड मान्य होईल. आम्ही कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडणारे नाही.’ यावेळी त्यांनी काँग्रेसचे राहुल पाटील यांचे नाव न घेता, ‘आता अडून राहू नका, लवकर या,’ असे आवाहनही केले.

Kolhapur Municipal Corporation : खोट्टं... खोट्टं बोलायचं नाय..., कुठून कोल्हापूर महापालिकेतून; घोटाळेबाज अधिकाऱ्यांसह ८ जणांवर कारवाई

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील (आसुर्लेकर) म्हणाले, ‘जिल्हा बँक व गोकुळच्या माध्यमातून मंत्री हसन मुश्रीफ यांनी सर्वसामान्यांसाठी निर्णय घेतले. बँक फायद्यात आणली. त्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मोठे पाठबळ मिळाले. विधानसभेमध्ये अपयश आले. आता सभासद वाढविणे हेच ध्येय असून, अधिकाधिक सभासद म्हणजेच विजय ही खूणगाठ बांधून घ्या.’ भैया माने म्हणाले, ‘पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीसाठी माझ्यावर नेत्यांनी जबाबदारी दिली असून, सर्वांच्या सहकार्यातून पुढे जाऊया.’ तालुकाध्यक्ष किसन चौगले यांनी प्रास्ताविक केले. माजी जिल्हा परिषद सदस्य विनय पाटील यांनी स्वागत केले.

यावेळी कार्याध्यक्ष अनिल साळोखे, संजय कलिकते, ‘बिद्री’चे संचालक उमेश भोईटे, संजय चितारी, राजेंद्र पाटील, राजेंद्र भाटळे, धनाजीराव पाटील, राजेंद्र पाटील, प्रा शिवाजी घाटगे, युवराज पाटील, फिरोजखान पाटील, शरद पाटील आदी उपस्थित होते. भिकाजी एकल यांनी आभार मानले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.