राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा पावसाळी अधिवेशन सुरु असताना सभागृहात रमी खेळतानाचा व्हिडिओ समोर आला होता. त्यामुळे विरोधकांनी कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी केली होती. मात्र आता त्यांच्याकडून कृषी खातं काढून घेतले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र त्यांचे मंत्रिपद अबाधित राहणार आहे. त्यांना आता दुसऱ्या एका खात्याचे मंत्री बनवले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्यात बैठक झाली होती, यात कोकाटे यांचा थेट राजीनामा घेण्याऐवजी त्यांचे खाते बदलले जाणार असल्याचा निर्णय झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
माणिकराव कोकाटेंना आता ‘हे’ खातं मिळणार
समोर आलेल्या माहितीनुसार, आता माणिकराव कोकाटेंकडे क्रीडा खातं दिलं जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हे खातं सध्या दत्तात्रय भरणे यांच्याकडे आहे. तर भरणे यांना आता कृषिमंत्रीपदाचा पदभार दिला जाण्याची शक्यता आहे. सभागृहात रमी खेळतानाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर आता हे खातेपालट केले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र याचा अंतिम निर्यण अद्याप झालेला नाही.
रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विरोधक त्यांचा राजीनामा मागत आहेत. मात्र आता कोकाटे यांचे खाते बदलले जाणार आहे. त्यामुळे विरोधक यावर काय भूमिका घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
कृषी खात्यासाठी धनंजय मुंडेंचेही नाव चर्चेत
धनंजय मुंडे कृषीमंत्री असताना त्या खात्यात आर्थिक गैरव्यवहार झाला, असा आरोप करण्यात आला होता. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने या मुंडेंना क्लीनचीट दिली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा कृषीखातं परत आपल्याला मिळावं, यासाठी प्रयत्न धनंजय मुंडे प्रयत्न करत आहेत अशी माहितीही समोर आली आहे. 30 जुलैच्या रात्री धनंजय मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. दोन्ही नेत्यांमध्ये साधारण अर्धा तास चर्चा झाली होती. त्यानंतर आजही मुंडे आणि फडणवीस यांच्यात भेट झाली. आज झालेल्या बैठकीला अजित पवार हेदेखील उपस्थित होते. त्यामुळे धनंजय मुंडे यांचे नावही कृषी खात्यासाठी चर्चेत असल्याची माहिती समोर आली आहे.