Icc Ranking : कसोटी मालिकेदरम्यान भारताच्या युवा फलंदाजाची पहिल्या स्थानी झेप, कोण आहे तो?
GH News July 30, 2025 10:13 PM

इंग्लंड विरुद्ध इंडिया यांच्यात कसोटी मालिका खेळवण्यात येत आहे. भारतीय संघ या मालिकेत 1-2 ने पिछाडीवर आहे. उभयसंघातील पाचवा आणि अंतिम सामना हा 31 जुलैपासून खेळवण्यात येणार आहे. त्याआधी भारतीय संघाला आनंदाची बातमी मिळाली आहे. भारताचा युवा सलामीवीर अभिषेक शर्मा याने धमाका केला आहे. अभिषेकने आयपीएलमधील सहकाऱ्याला आयसीसी टी 20i रँकिगमध्ये मागे टाकत पहिल्या स्थानी झेप घेतली आहे. अभिषेकने ऑस्ट्रेलियाचा फलंदाज आणि आयपीएलमध्ये सनरायजर्स हैदराबादसाठी सोबत खेळणाऱ्या ट्रेव्हिस हेड याला मागे टाकत हा कारनामा केला आहे.

हेड गेल्या अनेक महिन्यांपासून पहिल्या स्थानी विराजमान होता. मात्र हेडला विंडीज विरूद्धच्या टी 20i मालिकेत काही खास करता आलं नाही. हेडला त्याचाच फटका बसला. परिणामी अभिषेक हेडच्या पुढे निघाला. अभिषेक आणि हेड या दोघांमध्ये 15 रेटिंग पॉइंटचा फरक आहे. अभिषेकच्या खात्यात 829 रेटिंग आहे. तर दुसऱ्या स्थानी घसरण झालेल्या हेडच्या नावावर 814 रेटिंगची नोंद आहे.

यशस्वी जैस्वालला फटका

आयसीसीच्या या टी 20i रँकिंगमध्ये अभिषेक व्यतिरिक्त पहिल्या 10 फलंदाजांत तिलक वर्मा आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांचा समावेश आहे. तिलक वर्मा तिसऱ्या स्थानी आहे. तर सूर्यकुमार सहाव्या स्थानी आहे. तर युवा सलामीवीर टॉप 10 मधून बाहेर फेकला गेला आहे. यशस्वीची 11 व्या स्थानी घसरण झाली आहे. तसेच ऑस्ट्रेलियाच्या जोश इंग्लिस याने 6 जणांना मागे टाकत टॉप 10 मध्ये धडक दिली आहे.

अभिषेकची टी 20i कारकीर्द

अभिषेकने टी 20i क्रिकेटमध्ये आतापर्यंत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. अभिषेकने 16 डावांमध्ये 33.43 च्या सरासरीने 535 धावा केल्या आहेत. अभिषेकने या दरम्यान जवळपास 200 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत. अभिषेकने टी 20i कारकीर्दीत 193.84 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्यात. अभिषेकने या दरम्यान 2 शतकं आणि 2 अर्धशतकं झळकावली आहेत. अभिषेकने टी 20i क्रिकेटमध्ये खेळताना 41 षटकार आणि 46 चौकार झळकावले आहेत.

अभिषेकने 6 जुलै 2024 रोजी झिंबाब्वे विरुद्ध टी 20i पदार्पण केलं होतं. अभिषेकला पहिल्या सामन्यात भोपळाही फोडता आला नव्हता. मात्र अभिषेकने त्याच्या कारकीर्दीतील दुसऱ्या सामन्यातच शतक झळकावलं होतं. अभिषेकने त्या सामन्यात 8 षटकार लगावले होते. अभिषेक त्यानंतरच्या 7 सामन्यात अपयशी ठरला. त्यानंतर अभिषेकने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अर्धशतक ठोकलं होतं.

अभिषेकने त्यानंतर इंग्लंड विरुद्ध मायदेशात झालेल्या टी 20i मालिकेत शतक केलं होतं. अभिषेकने मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये 13 षटकारांच्या मदतीने 54 चेंडूत 135 धावा केल्या होत्या. अभिषेकला याच स्फोटक खेळीमुळे टी 20i क्रिकेटमध्ये पहिल्या स्थानी झेप घेण्यास मदत झालीय.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.