मुरुड : परराज्यातील अल्पवयीन मुलीस फुस लावून गुंगीचे औषध देऊन लॉजवर बलात्कार करत त्याचा व्हिडिओ तयार करून ब्लॅकमेल करत वारंवार बलात्कार केल्या प्रकरणात खळबळ जनक बातमी हाती आली असून पोलिसांनी धाराशिव जिल्हा भाजपा युवा मोर्चाचा जिल्हा उपाध्यक्षासह इतर दोघांना या प्रकरणात आरोपी केले आहे. यापैकी एकाला अटक केली असून भाजपा युवा मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्ष सह एक जण फरार आहे.
पोटाची खळगी भरण्यासाठी पश्चिम बंगाल मधून मुरुड येथे आलेल्या एका दाम्पत्याच्या अल्पवयीन मुलीस येथील योगेश राठोड या तरुणाने फुस लावून गुंगीचे औषध देऊन तिच्यावर मुरुड ढोकी रोडवरील एका हॉटेलमध्ये बलात्कार केला होता. आरोपीने यावेळी अश्लील व्हिडिओ तयार केला होता. सदरील व्हिडिओ सोशल मीडियावर टाकून तुझी बदनामी करतो म्हणून या मुलीवर विविध ठिकाणी बोलावून वारंवार बलात्कार केला गेला. मुलीने विरोध केल्यानंतर हे व्हिडिओ मुलीच्या वडिलांना पाठवण्यात आले. यानंतर मुलीच्या पालकांनी पोलीस ठाणे गाठले या प्रकरणात मुरुड पोलीस ठाण्यामध्ये बुधवार 23 जुलै रोजी योगेश राठोड या युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणाचा तपास लातूर ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कुमार राऊत हे करत आहेत. या मुलीने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सखोल तपास केला असता या गुन्ह्यासह इतरही काही गुन्ह्याचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागल्याचे समजते. हा गुन्हा पोलीस ठाण्यात दाखल होऊ नये यासाठी काही लोकांनी खूप प्रयत्न केले होते. मुरुड शहरात या प्रकरणाची मोठी चर्चा झाली होती .
याची दखल घेत उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कुमार राऊत यांनी स्वतः या प्रकरणाचा तपास व्यक्तिशः वेळ देऊन केला . मुख्य आरोपीस सहकार्य करणारा त्याचा मित्र व फोटोग्राफर अनिल जाधव यालाही पोलिसांनी अटक केली. अटकेतील आरोपींना पोलीस कोठडी नंतर त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. याच प्रकरणात मुरुड ..ढोकी रोडवरील राधिका बार व लॉज या ठिकाणी मुलीवर अतिप्रसंग करण्यात आला होता.
त्याचे व्हिडिओही त्याच ठिकाणी तयार केले असल्याचा संशय आहे. या प्रकरणी पोलिसांनी लॉज चे मालक तथा धाराशिव जिल्हा भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष विश्वजीत लंगडे तसेच बारचा मॅनेजर बाबुराव सगर यांनाही आरोपी केले आहे. सदरील दोन्ही आरोपी फरार आहेत. गुन्हा दाखल होऊ नये म्हणून काही लोकांनी केलेला आटापिटा व आता सत्ताधारी भाजपच्या युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांचे या प्रकरणात आलेले नाव यामुळे मुरुड परिसरात खळबळ माजली आहे.
अशा प्रकरणात अल्पवयीन मुला-मुलींना व टवाळ मुलांना सहकार्य करणारी टोळी मुरुड मध्ये कार्यरत असल्याची चर्चा असून या टोळीचा मोरक्या एका राजकीय पक्षाचा पदाधिकारी असल्याचे समजते. या टोळीतील काही लोकांनी या प्रकरणातील आरोपींना सहकार्य केले असल्याचीही चर्चा नागरिकात आहे.
राजकीय हस्तक्षेपाला न जुमानता पोलिसांकडून परराज्यातील अल्पवयीन मुलीला न्याय देण्यासाठी केल्या जात असलेल्या प्रयत्नाबाबत नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत असून पोलिसांचे कौतुक करण्यात येत आहे.