थेऊर, ता. २९ ः थेऊर (ता. हवेली) येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळ कर्तव्यात कसूर करत असून, कारखान्याच्या मालकीच्या १०० एकर जमीन विक्रीप्रक्रियेत सभासदांना विश्वासात न घेता मनमानी प्रक्रिया चालू आहे. त्यामुळे त्यांच्या गैरकारभाराची चौकशी करून संचालक मंडळ बरखास्त करावे, अशी मागणी यशवंत सहकारी साखर कारखाना बचाव समितीने निवेदनाद्वारे केली आहे.
या आशयाचे निवेदन कारखाना बचाव समितीने साखर आयुक्तांना दिले आहे. या निवेदनावर समितीचे अध्यक्ष विकास लवांडे, सचिव लोकेश कानकाटे व सदस्य राजेंद्र चौधरी यांच्या सह्या आहेत. या निवेदनानुसार कारखान्यातील गैरकारभार, तसेच मनमानी पद्धतीने जमीनविक्रीच्या प्रयत्नाबाबत त्यांचे लक्ष वेधले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, प्रादेशिक सहसंचालक (साखर), महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अवसायक व २०११ पासूनच्या प्रशासकांनी अतिशय बेजबाबदारपणा दाखवून कामकाजात हलगर्जीपणा व कर्तव्यात कसूर केलेला आहे. त्यामुळे कारखान्याचे कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे. संस्था बंद पडून कर्जाचा नाहक बोजा वाढला आहे. सन २०११ पासून वेळोवेळी नियुक्त केलेले प्रशासक, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अवसायक, प्रादेशिक सहसंचालक साखर, विद्यमान अध्यक्ष व संचालक मंडळ जबाबदार आहेत.
मुंबई उच्च न्यायालयातील रिट पिटिशनचे बारकाईने अवलोकन करावे. प्रशासक, बँक अवसायक व विद्यमान संचालक मंडळ यांनी त्यांच्या कार्यकाळात पदभार घेताना नियमानुसार ताबा पावत्या केलेल्या नाहीत. कारखान्याच्या स्थावर व जंगम मालमत्तांचे कोट्यवधी रुपयांच्या झालेल्या नुकसानीस प्रशासक, अवसायक, अध्यक्ष व संचालक मंडळ यांच्यावर त्याची जबाबदारी निश्चित करावी. कारखान्याचे वेळोवेळी झालेले शासकीय लेखापरीक्षण संशयास्पद वाटते. त्यामुळे कारखान्याची ताळेबंदाप्रमाणे असलेली व प्रत्यक्षात असलेली सर्व प्रकारची कर्जे, सभासद, कामगार देणे, शासकीय देणे व इतर देणे, तसेच येणे असलेल्या रकमा यांची पडताळणी तज्ज्ञांमार्फत करण्यात यावी आणि दोषींवर कायदेशीर कारवाई व्हावी.