काही दशकांपूर्वी ‘बी.टेक.’ (B.Tech) या पदवीला खूप महत्त्व होते, आणि त्यातही ‘कॉम्प्युटर सायन्स’ मध्ये बी.टेक. केलेल्या विद्यार्थ्यांना लगेच उच्च पदांवर संधी मिळत असे. पण आता ‘जॉब मार्केट’ खूप वेगाने बदलले आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या आगमनामुळे, इंजिनिअर्सना आता केवळ पदवीवर अवलंबून न राहता, इतर कौशल्ये आणि सर्जनशीलतेवरही लक्ष केंद्रित करणे अनिवार्य झाले आहे. गुगलचे अँड्रॉइड हेड आणि गुगल प्लेचे व्हाईस प्रेसिडेंट समीर सामत (Sameer Samat) यांनी भावी इंजिनिअर्सना अत्यंत महत्त्वाचा आणि कामाचा सल्ला दिला आहे.
गुगलमध्ये उच्च पदावर कार्यरत असलेले समीर सामत यांनी स्पष्ट केले की, औपचारिक शिक्षण हे केवळ एक मूलभूत पाया आहे; खरी प्रगती आणि यश हे सतत शिकण्याने आणि नवनवीन गोष्टी शोधण्याने मिळते. टेक इंडस्ट्री अत्यंत वेगाने बदलत आहे. अशा परिस्थितीत, इंजिनिअर्ससाठी एआय , मशीन लर्निंग (Machine Learning) आणि क्लाउड कॉम्प्युटिंग यांसारख्या क्षेत्रांमध्ये प्राविण्य मिळवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यांनी ‘टीमवर्क’ आणि ‘कम्युनिकेशन स्किल्स’नाही खूप आवश्यक असल्याचे सांगितले.
समीर सामत यांच्या मते, पदवी ही केवळ एक सुरुवात आहे, पण नेतृत्वगुण (Leadership) आणि समस्या सोडवण्याची कौशल्ये (‘प्रॉब्लम सॉल्व्हिंग स्किल्स’) हीच एका इंजिनिअरला विशेष बनवतात. आजकाल पदवीपेक्षा कौशल्यांना अधिक महत्त्व दिले जात आहे, त्यामुळे केवळ पुस्तकी ज्ञानाऐवजी व्यावहारिक कौशल्यांवरही लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे.
1. समीर सामत यांनी इंजिनिअर्सना त्यांच्या पदवीच्या पलीकडे जाऊन विचार करण्याचा सल्ला दिला. केवळ औपचारिक शिक्षणच यशाची हमी देत नाही, हे त्यांनी जोर देऊन सांगितले. त्यामुळे तांत्रिक कौशल्यांसोबतच सर्जनशीलता आणि समस्या सोडवण्याची कौशल्ये देखील विकसित करा.
2. टेक इंडस्ट्री अत्यंत वेगाने बदलत आहे, त्यामुळे इंजिनिअर्सनी नवीन ट्रेंड्ससोबत तालमेल साधणे आवश्यक आहे. त्यांनी एआय, मशीन लर्निंग आणि क्लाउड कॉम्प्युटिंग यांसारख्या क्षेत्रांमध्ये कौशल्ये विकसित करण्यावर लक्ष देण्याचा सल्ला दिला.
3. तांत्रिक ज्ञानासोबतच ‘टीमवर्क’ आणि ‘कम्युनिकेशन स्किल्स’ असणेही खूप महत्त्वाचे आहे, यावर समीर सामत यांनी भर दिला. इंजिनिअर्सनी आपल्या टीमसोबत समन्वय साधून काम करावे आणि गुंतागुंतीच्या तांत्रिक गोष्टी इतरांना सोप्या भाषेत समजावून सांगण्यास सक्षम असावे, असे ते म्हणाले.
4. गुगलचे वरिष्ठ कार्यकारी (Senior Executive) म्हणून, समीर सामत यांनी इंजिनिअर्सना ‘युझर-केंद्रित’ (User-Centric) उत्पादने तयार करण्याचा सल्ला दिला. तंत्रज्ञानाचे खरे मूल्य तेव्हाच समोर येते, जेव्हा ते वापरकर्त्यांच्या समस्यांचे निराकरण करते. इंजिनिअर्सनी ‘युझर एक्सपिरियन्स’ (UX) आणि त्यांच्या गरजा समजून घेण्यावर लक्ष केंद्रित करावे.
5. सामत यांनी गुगलच्या अँड्रॉइड रणनीतीबद्दलही (Android Strategy) सांगितले. यात भारतासारख्या विकसनशील राष्ट्रांवर विशेष लक्ष दिले जात आहे. गुगल स्वस्त स्मार्टफोन आणि स्थानिक ॲप्सच्या (Local Apps) माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत तंत्रज्ञान पोहोचवण्यावर काम करत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. या सर्व टिप्स भविष्यातील इंजिनिअर्सना बदलत्या तंत्रज्ञान क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी एक स्पष्ट दिशा देतात.