तू गेलीस, मी तरी जगून काय करू? पत्नीच्या निधनानंतर बसल्या बसल्याच त्यानेही जीव सोडला; एकाच चितेवर दोघांना जळताना पाहून…
Tv9 Marathi August 01, 2025 03:45 AM

‘साथ जिएंगे साथ मरेंगे’हे वाक्य आपण अनेकदा चित्रपटांमध्ये ऐकलं असेल. पण खऱ्या आयुष्यातही असं काही घडतं का? तर होय, असंच काहीसं घडलं आहे हरियाणातील रेवाडीमध्ये. जिल्ह्यातील पिठनवास गावात एका वृद्ध जोडप्याचा एकमेकांपासून काही मिनिटांच्या अंतरावर मृत्यू झाला. प्रथम 90 वर्षीय सुरजी देवी यांचे निधन झाले आणि त्यांच्या मृत्यूच्या 30 मिनिटांनंतर, त्यांचे 93 वर्षीय पती दलिप सिंग यांचेही खुर्चीवर बसल्या बसल्या निधन झाले.

अंतिम यात्रा ढोल-ताशांच्या गजरात पार पडली

सुरुवातीला दलिप सिंग यांना त्यांच्या पत्नीच्या मृत्यूबदद्ल माहिती नव्हती, पण जेव्हा त्यांना याबद्दल सांगण्यात आलं तेव्हा त्यांना फार धक्का बसला.त्या धक्क्यातच त्यांचंही निधन झालं. कुटुंबातील सदस्यांनी मृत जोडप्याला निरोप दिला. त्यांची अंतिम यात्रा ढोल-ताशांच्या गजरात पार पडली आणि मिरवणुकीला रंगीबेरंगी फुग्यांनी सजवण्यात देखील आलं होतं. तसेच एकाच चितेवर या जोडप्याचे अंत्यसंस्कार करण्यात आले.

डॉक्टरांनी मृत्यूची पुष्टी केली

गावकऱ्यांनी सांगितले की, सुरजी देवी आणि दलिप सिंग दोघेही वृद्धापकाळात असूनही पूर्णपणे निरोगी होते. बुधवारी सकाळी दोघेही एकत्र उठले. यानंतर, सुनेने त्यांना चहा दिला. दलिप सिंग यांनी चहा प्यायला, पण सुरजी देवींनी तो पिण्यास नकार दिला. त्यानंतर, त्या पुन्हा खाटेवर झोपल्या. जेव्हा सून पुन्हा सुरजी देवींना बघायला आली तेव्हा त्यांचा श्वास थांबला होता, त्यानंतर सुनेने कुटुंबातील इतर सदस्यांना बोलावले. यानंतर, गावातून ताबडतोब डॉक्टरांना बोलावण्यात आले, तपासणीनंतर डॉक्टरांनी सुरजी देवी यांना मृत घोषित केले.

पत्नीच्या मृत्यूची बातमी कळताच काही मिनिटांतच मृत्यू झाला

मात्र, दलिप सिंग यांना काहीच माहित नव्हते. गावकरी आणि कुटुंबीयांनी अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली. नातेवाईकांना माहिती देण्यात आली. यादरम्यान, दलिप सिंग यांच्या मुलाने त्यांना आईच्या आणि त्यांच्या पत्निच्या मृत्यूची माहिती दिली. त्यावेळी दलिप सिंग खुर्चीवर बसले होते. पत्नीच्या मृत्यूची बातमी ऐकून दलिप सिंग एकमदच शांत राहिले. त्यांचा चेहरा फिका पडला आणि काही मिनिटांतच त्यांचाही मृत्यू झाला.

कुटुंबात कोण कोण आहे?

सुरजी देवी आणि दलिप सिंग यांना दोन मुले आहेत. मोठा मुलगा राजेंद्र सिंग सैन्यात होता आणि सुमारे 20 वर्षांपूर्वी त्याचे निधन झाले. धाकटा मुलगा फूल सिंग शेतकरी आहे. त्याला चार मुली आहेत ज्यांचे लग्न झाले आहे. सुरजी आणि दलिप यांच्या कुटुंबात तीन नातू आणि पणतू देखील आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.