थॅलेसेमिया आजाराचा राष्ट्रीय कार्यक्रमात समावेश करणार
केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना पत्र
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ३१ : सिकलसेल आजारासह थॅलेसेमिया आजाराचाही राष्ट्रीय कार्यक्रमात समावेश करण्याचा प्रयत्न आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर करणार आहेत. याबाबत, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना पत्रव्यवहार करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
आरोग्यसेवा आयुक्तालय मुंबई येथे बुधवारी (ता. ३०) आयोजित बैठकीत थॅलेसेमिया आजाराचे निदान, या आजाराचा उपचार, प्रतिबंध व त्याबाबतचे प्रशिक्षण, रुग्णांसाठीच्या कल्याणकारी योजना तसेच या आजारासाठी २०२५-२६ या आर्थिक वर्षातील तरतूद याविषयीचा त्यांनी आढावा घेतला. सिकलसेल व थॅलेसेमिया हे दोन्ही रक्ताशी संबंधित आजार आहेत. सध्या सिकलसेल आजाराला राष्ट्रीय कार्यक्रम म्हणून मान्यता असल्याने केंद्र शासनाकडून रुग्णांसाठी मदत होते. या राष्ट्रीय कार्यक्रमात थॅलेसेमिया आजाराचा समावेश केल्यास त्या रुग्णांनासुद्धा केंद्रीय योजनांचा लाभ मिळेल.
विवाहापूर्वी तपासणीची गरज
नागरिकांनी विवाहापूर्वी थॅलेसेमिया तपासणी करावी. गर्भवती मातेची प्रसूतिपूर्व व महाविद्यालयीन युवकांची तपासणी होणे आवश्यक असून, या आजाराबाबत व्यापक जनजागृती करण्याच्या सूचनाही या वेळी आरोग्यमंत्री यांनी दिल्या. थॅलेसेमिया निर्मूलन करण्यासाठी आरोग्यसेवा आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समिती स्थापन करावी. या समितीमध्ये सामाजिक संस्था, रेड क्रॉस सोसायटी, इंडियन मेडिकल असोसिएशनचे प्रतिनिधी, तज्ज्ञ डॉक्टर आदींचा समावेश असावा. समितीला कालमर्यादा ठरवून काम सुरू करण्याच्या सूचना आबिटकर यांनी दिल्या.