वालावलकर रुग्णालयात दंतचिकित्सा
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ३१ : दाताचे उपचार शासनाच्या कोणत्याही योजनेतून होत नाहीत. त्यामुळे सर्वसामान्य रुग्णांची गैरसोय होते, हे लक्षात घेऊन डेरवण येथील वालावलकर रुग्णालयाने दंतविभागामार्फत कमीत कमी खर्चात दातांवर चांगले उपचार देण्यास सुरुवात केली आहे.
वालावलकर रुग्णालयामधील दंतविभागात दात काढणे, दाताच्या नसेवर उपचार करणे, दात साफ करणे हे उपचार घेण्यासाठी दररोज अनेक रुग्ण येतात तसेच दाताला कॅप बसवणे, दातामध्ये सिमेंट किंवा चांदी भरणे हे सुद्धा केले जाते. अपघातात जर जबड्याला मार लागला असेल किंवा दात तुटला असेल तर या ठिकाणी दंतचिकित्सा केली जाते. वालावलकर रुग्णालयात डॉ. संगीता, डॉ. दीपक, डॉ. अश्विनी, डॉ. अमृता, डॉ. सेजल व डॉ. गायत्री असे सहा दंतचिकित्सा दररोज उपलब्ध असतात. वालावलकर रुग्णालयाच्या चिपळूण अर्बन हेल्थ सेंटरमध्येही दातांवर उपचार करण्यासाठी दर रविवारी दंतचिकित्सा उपलब्ध असतात. त्यामुळे अनेक दंतरुग्णांना दिलासा मिळत आहे, असे रुग्णालयाच्या संचालिका डॉ. सुवर्णा पाटील यांनी सांगितले.