Latest Maharashtra News Updates : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल: निर्दोषांची सुटका, समीर कुलकर्णी यांना अश्रू अनावर
esakal August 01, 2025 01:45 PM
Malegaon Bomb Blast Live: मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा निकाल: निर्दोषांची सुटका, समीर कुलकर्णी यांना अश्रू अनावर

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात विशेष एनआयए कोर्टाने ऐतिहासिक निकाल देत सर्व आरोपींना निर्दोष घोषित केले आहे. न्यायालयाने स्पष्टपणे नमूद केले की केवळ संशयाच्या आधारे कोणालाही दोषी ठरवता येत नाही. तब्बल १७ वर्षांनी आलेल्या या निर्णयानंतर कोर्टात भावनिक क्षण पाहायला मिळाले, जेव्हा समीर कुलकर्णी यांनी अश्रू अनावर करत आपल्या भावना व्यक्त केल्या. या निकालामुळे देशात मोठी खळबळ उडाली असून, तपास यंत्रणांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

Latest Maharashtra News Updates : मालेगावात बंदोबस्तात वाढ, बॉम्बस्फोट प्रकरणी निकाल वाचनाला सुरुवात

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील निकाल वाचनाची प्रक्रिया आजपासून सुरू झाली असून, या पार्श्वभूमीवर मालेगाव शहरात सुरक्षेची कडक उपाययोजना करण्यात आली आहे. 2008 साली झालेल्या या स्फोटप्रकरणात सहा जणांचा मृत्यू झाला होता आणि अनेक जण जखमी झाले होते. प्रकरणातील प्रमुख आरोपी प्रज्ञा सिंह ठाकूर, लेफ्टनंट कर्नल पुरोहित यांच्यासह इतर आरोपींच्या निकालावर संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. कोर्टात मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, नागरिकांमध्ये उत्सुकतेसोबतच थोडीशी अस्वस्थताही आहे

Malegaon: थोड्याच वेळात निकाल, मालेगावात कडेकोट बंदोबस्त

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी सर्वोच्च न्यायालय आज निकाल देणार आहे. या निकालाच्या वाचनाला सुरुवात होणार असल्यानं कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मालेगावात बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. भिक्खू चौकात पोलीस बंदोबस्त वाढवला असून गर्दी होऊ नये यासाठी जमावाला पांगवण्यास सुरुवात झालीय.

Pune: कृषिमंत्री माणिकराव कोकाटे पुणे दौऱ्यावर, कार्यशाळेला माध्यमांना परवानगी नाही

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे आज पुणे दौऱ्यावर आहेत. या पार्श्वभूमीवर कोकाटे यांच्या पुण्यातील निवासस्थाना बाहेर कडेकोट सुरक्षा तैनात केली आहे. आज पुण्यात कृषी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलं आहे. कार्यशाळेलासुद्धा माध्यमांना परवानगी नाही

Pune News : राज्यात पाऊस ओसरला, विदर्भात यलो अलर्ट

राज्यात पावसाचा जोर कमी झाला असला तरी विदर्भात यलो अलर्ट जारी करण्यात आलाय. गेल्या पाच ते सहा दिवसांपासून राज्याच्या बहुतांश भागात पावसाची संततधार सुरू होती. मात्र आता पाऊस कमी झाला आहे. विदर्भातील काही जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

Malegaon Blast Virdict Live : आम्हाला निर्दोष सोडले जाईल- मेजर रमेश उपाध्याय (निवृत्त)

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात एनआयए न्यायालय निकाल देणार आहे, यावर आरोपी मेजर रमेश उपाध्याय (निवृत्त) यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, "आम्हा सर्वांना निर्दोष सोडले जाईल. आमच्याविरुद्ध कोणताही पुरावा नाही. आमच्याविरुद्ध सादर केलेले सर्व पुरावे आम्ही खोटे सिद्ध केले आहेत. "

Pune Live : चंदननगरमध्ये माजी सैनिकाच्या घरी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांचा गोंधळ

चंदननगरमध्ये माजी सैनिकाच्या घरी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांचा गोंधळ घातला. माजी सैनिक हकीमुद्दीन यांचे पुतणे शमशाद शेख म्हणतात, "रात्री ११:४५ च्या सुमारास त्यांनी आमच्या दारावर जोरात ठोठावले. उघडताच ५-७ लोक घरात घुसले. एकूण ८० लोक होते... ते वेळ वाया घालवू नका, तुमचे आधार कार्ड दाखवा, अन्यथा आम्ही तुम्हाला मारून टाकू असे म्हणू लागले. दाखवल्यावर त्यांनी आमचे आधार कार्ड बनावट असल्याचा दावा केला. आम्ही त्यांना ओळखत नाही, पण त्यांनी आम्हाला सांगितले की ते बजरंग दलाचे आहेत... पोलिस साध्या वेशात आले होते, त्यामुळे सुरुवातीला आम्हाला त्यांची ओळख पटवता आली नाही

Russia Attacks : युक्रेनी तळावर रशियाचा हल्ला; तीन सैनिकांचा मृत्यू, तर १८ सैनिक जखमी

किव्ह : रशियाने आज युक्रेनी सैन्याच्या प्रशिक्षण तळावर हल्ले केले. या हल्ल्यामध्ये तीन सैनिकांचा मृत्यू झाला, तर १८ सैनिक जखमी झाले. चेर्निहिव्ह भागातील या प्रशिक्षण तळावर हल्ला करण्यासाठी रशियाने इस्कँडर प्रकारच्या दोन क्षेपणास्त्रांचा वापर केला. रशियाविरोधातील युद्धात युक्रेनला शस्त्रास्त्रांबरोबरच सैन्यबळाचीही कमतरता भासत असून रशियानेही सध्या युक्रेनच्या सैन्य तळांनाच लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. मंगळवारी रात्री युक्रेनमध्ये विविध ठिकाणी ७८ ड्रोनद्वारे हल्ले करण्यात आले.

Kolhapur News : पेठवडगावच्या ‘राज गॅंग’च्या आठ जणांवर हद्दपारीची कारवाई

पेठवडगाव : गर्दी, मारामारीसह गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या पेठवडगावच्या राज पाटील टोळीवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली. टोळीतील १९ जणांविरोधात कारवाई होणार असून, आठ जणांवर एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले. उर्वरीत ११ जणांवर पोलिस ठाण्याकडून पुढील कारवाई सुरू आहे.

Malegaon Bomb Blast Case : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा आज निकाल

मुंबई: आरोपींचे वेगवेगळ्या कायदेशीर मुद्द्यांवर एकामागोमाग अर्ज, मुंबई उच्च न्यायालय सर्व सर्वोच्च न्यायालयात अपिले, तपाससंस्थांमधील बदल, खटल्याची सुनावणी करणाऱ्या न्यायाधीशांच्या बदल्या अशा अनेक कारणांमुळे प्रदीर्घ रखडपट्टी झालेल्या मालेगाव बॉम्बस्फोट-२००८ या प्रकरणाचा निकाल अखेर आज, गुरुवारी जाहीर होणार आहे. मुंबई सत्र न्यायालय इमारतीतील विशेष एनआयए न्यायालयाचे न्यायाधीश ए. के. लाहोटी हे हा बहुचर्चित निर्णय सकाळी ११ वाजता सुनावणार आहेत.

Prajwal Revanna : हासनचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णाच्या भवितव्याचा उद्या होणार फैसला

बंगळूर : हासनचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या चार लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांपैकी एका प्रकरणाचा निकाल बुधवारी विशेष न्यायालयाने शुक्रवार (ता. १ ऑगस्ट) पर्यंत पुढे ढकलला. हासन जिल्ह्यातील होळेनरसीपूर येथे प्रज्वल रेवण्णा याने घरकाम करणाऱ्या ४८ वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याच्या प्रकरणाची सुनावणी करणारे न्यायमूर्ती संतोष गजानन भट यांनी बुधवारसाठी (ता. ३०) निकाल राखून ठेवला होता. निकाल सुनावण्यापूर्वी न्यायाधीश संतोष गजानन भट्ट यांनी दोन्ही बाजूंच्या वकिलांकडून काही स्पष्टीकरण मागितले. ‘गुगल मॅप्स’ला पुरावा म्हणून मानले जाऊ शकते का? त्यांनी सॅमसंग जे-४ मोबाईल जप्त केल्याबद्दल माहितीदेखील मागितली आणि निकाल पुढे ढकलला. स्पष्टीकरण आवश्यक असल्याने बुधवारी निकाल जाहीर करता येणार नाही. एक ऑगस्ट रोजी निकाल जाहीर केला जाईल, असे न्यायाधीशांनी सांगितले.

Mahad-Raigad Highway : महाड-रायगड महामार्गाला 'छत्रपती महामार्ग' नाव द्या; संभाजीराजेंची मंत्री गडकरींकडे मागणी

कोल्हापूर : ‘महाड ते रायगड राष्ट्रीय महामार्गाला ''छत्रपती महामार्ग'' असे नामकरण करण्यात येईल’, अशी ग्वाही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज दिली. रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी मंत्री गडकरी यांची नवी दिल्ली येथे सदिच्छा भेट घेत तशी मागणी केली.

Valmik Karad : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण : वाल्मीक कराड हाच खुनाचा मुख्य सूत्रधार

बीड : मस्साजोग (ता. केज) येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी विशेष तपास पथकाने न्यायालयात सादर केलेल्या दोषारोपपत्रात वाल्मीक कराड हाच खुनाचा मुख्य सूत्रधार असल्याचे नमूद केले होते. त्यावर आता विशेष मोका न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे. या खटल्यातून त्याचा दोषमुक्तीचा अर्ज आज फेटाळताना विशेष मोका न्यायालयाने वाल्मीक कराड हाच सूत्रधार असल्याचे निरीक्षण नोंदवले आहे. संतोष देशमुख यांचे नऊ डिसेंबर २०२४ ला अपहरण करून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. २२ जुलैला हा अर्ज फेटाळण्यात आला असून, पुढील सुनावणी चार ऑगस्टला आहे.

Donald Trump : भारतावर २५ टक्के आयातशुल्क लागू; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा

Latest Marathi Live Updates 31 July 2025 : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर २५ टक्के आयातशुल्क लागू करण्याची घोषणा केली. हा कर एक ऑगस्टपासून लागू होणार आहे. भारताबरोबरील व्यापारतूट प्रचंड मोठी आहे, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. तसेच ‘महाड ते रायगड राष्ट्रीय महामार्गाला ''छत्रपती महामार्ग'' असे नामकरण करण्यात येईल’, अशी ग्वाही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. हासनचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या चार लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांपैकी एका प्रकरणाचा निकाल बुधवारी विशेष न्यायालयाने शुक्रवार (ता. १ ऑगस्ट) पर्यंत पुढे ढकलला. गुजरातच्या दहशतवाद विरोधी पथकाच्या (एटीएस) अधिकाऱ्यांनी शहरात लपून बसलेल्या आणि दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी झालेल्या, तसेच दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या महिलेला अटक केली. मस्साजोग (ता. केज) येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी विशेष तपास पथकाने न्यायालयात सादर केलेल्या दोषारोपपत्रात वाल्मीक कराड हाच खुनाचा मुख्य सूत्रधार असल्याचे नमूद केले होते. त्यावर आता विशेष मोका न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.