पृथ्वीतत्त्वाचा संबंध असतो गंधाशी. जेथे गंध-वास-सुवास तेथे, पृथ्वीतत्त्वाचा वास. नाकाने मुख्यतः वास-सुगंध म्हणजेच पृथ्वीतत्त्वाचा स्वीकार होतो. देव देवता तर नुसत्या वासानेच अन्नग्रहण करतात.
पृथ्वी व पर्यायाने जलतत्त्व म्हणजेच कफदोष उत्पन्न झाला तर नाकास आपले कार्य करणे अवघड जाते. नाकाच्या पोकळीचा, आवाज व शब्दांना घाट तसेच गोडवा देण्यासही उपयोग होतो. म्हणून नाक भरले म्हणजे शब्द गेंगाणा होतो.
नाक, कान, डोळे, तोंड हे खरे तर ‘आत येण्याचे राजमार्ग’ पण त्या मार्गाने काही बाहेर पडले तर ती अनारोग्याची सूचनाच समजावी. तसं पाहता, डोळ्यांनी आत सोडलेल्या चित्रामुळेच वासनेचे विष तयार होते किंवा प्रकृतीस काय, किती प्रमाणात मानवेल हा विचार न करता तोंडाने आत सोडलेले अन्नच आरोग्याला घातक ठरते.
परंतु नको असलेले जंतू जेव्हा नाक श्र्वासाबरोबर आत ओढते तेव्हा सर्दी, पडसे, न्यूमोनिया, क्षय असे अनेक रोग होऊ शकतात पण ते व्यक्तिगत राहतात. नाकातून बाहेर जाणाऱ्या श्र्वास, हवा शिंकेबरोबर बाहेर जाणाऱ्या जंतूंचा उपद्रव सर्वांनाच होतो. म्हणून शिंकताना, खोकताना नाका-तोंडावर रुमाल धरावा.
थुंकीवाटे पण इतरांना हा त्रास होऊ शकतो. म्हणून वाटेल तेथे थंकू नये. एकूण शरीरात आत-बाहेर जाण्याच्या मार्गावर योग्य नियंत्रण ठेवले नाही तर पृथ्वीवर व अवकाशात मनुष्य वस्तीपेक्षा अनेक अनेक पटींनी जास्त असलेल्या जंतू, व्हायरस, बॅक्टेरिया यांचे आरोग्यावरील आक्रमण थांबवता येणार नाही.
बाहेरून आल्यावर हात-पाय धुऊन घरात येणे किंवा कमीत कमी स्वयंपाकघरात, जेवणघरात जाताना हा नियम अवश्य पाळावा. चप्पल, जोडे घराबाहेर काढणे हे समाज परंपरेचे नियम जंतूंपासून, घाणीपासून संरक्षण मिळावे म्हणूनच पाळले जातात.
काम करत असताना अनवधानाने डोळे, नाक, तोंड यांना हात लागतो. सर्व जणांनी हाताळलेल्या गोष्टींना (उदा. दाराचे हँडल, खुर्ची, टेबल) हाताचा स्पर्श झाला व नंतर तोच हात डोळे, तोंड वगैरे ठिकाणी लागल्यास आक्रमण करण्यास टपून बसलेल्या जंतूंचे आयतेच फावते.
अधून-मधून व खाण्या-जेवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवावे. लहान मुलांच्या बाबतीत तर ही काळजी खास घ्यावी लागते. सर्वच रोगांसाठी जंतू जबाबदार असले तरी सर्दी-पडशासाठी हात न धुतल्यामुळे व घाण हवेतून येणारा संसर्गच जास्त जबाबदार असतो. सिनेमा, नाटक पाहण्यास गेल्यावर बंद हवेत अनेक माणसे बसल्यामुळे दुसऱ्या दिवशी सर्दीचा त्रास झाल्याचा अनुभव अनेकांना असेलच.
माशांमुळेही जंतू पसरण्यास मदत हेोते त्यामुळे उघडे, माशा बसलेले अन्न खाऊ नये. सर्दीचे जंतू जरी सर्वांवरच आक्रमण करत असले तरी प्रतिकारशक्ती उत्तम असणाऱ्यांना सहसा त्याचा त्रास होत नाही. शरीराची पचनशक्ती उत्तम ठेवून वीर्य-ताकद वाढेल असा आहार, च्यवनप्राश (नुसता आवळ्या-भोपळ्याचा मुरांबा नव्हे), गहू-नाचणी सत्त्व, पराठे, खीर, फळफळावळ, बाभळीचा डिंक, शतावरी वगैरे खाऊन तसेच चालणे, पोहणे, योगासने असा व्यायाम करून शरीराची ताकद वाढवल्यास सर्दी-पडसे दूर राहते.
ओल्या डोक्यावर वारा लागू न देणे, थंड वाऱ्यापासून आडोसा घेणे, रात्रीचे फार थंड पदार्थ न खाणे व अधून मधून आले, गवती चहा टाकलेला हर्बल चहा पिणे हे तर सर्दी-पडशापासून दूर राहण्याचे उत्तम इलाज आहेत.
सर्दी-पडसे झालेच तर न्यूमोनिया वगैरे होईपर्यंत न थांबता लगेच औषधे घ्यावीत. सर्दीवर २-३ दिवस विश्रांती (म्हणजेच शरीराला ताकद पुन्हा जमा करण्यास मिळणारा वेळ) द्यावी. पण वारंवार होणारी व अनेक दिवस चालणारी सर्दी असल्यास लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. डोळे, नाक, तोंड यांना हात लागेल व खाता-पिताना हाताचा उपयोग करताना प्रत्येकाने हात धुवायची सवय न ठेवल्यास सर्दी-पडसे हात धुवून तुमच्या मागे लागेल! पावसाळ्यात तर सर्दी-पडसे मागे लागणार नाही याची विशेष खबरदारी घ्यावी लागेल.
सर्दी-पडशावर प्रकारानुसार, कारणानुरूप तसेच व्यक्तीच्या प्रकृतीनुसार उपचारांची योजना करावी लागते. मात्र कोणत्याही प्रकारच्या सर्दी-पडशात खालील गोष्टी पाळाव्या लागतात.
ज्या ठिकाणी फार वारे येणार नाही अशा ठिकाणी राहाणे.
तेल लावून शेक करणे.
औषधी धुरी घेणे किंवा औषधांचे धूम्रपान करणे.
गुळण्या करणे.
उबदार कपडे घालणे, विशेषतः डोके गरम वस्त्रांनी व्यवस्थित आच्छादणे.
पचायला हलके, स्निग्ध, ताजे, गरम अन्न खाणे.
कोणत्याही सर्दी-पडशात मुळात वातदोष कारणीभूत असल्याने वातदोषाला संतुलित करू शकतील अशा आंबट, खारट रसांनी युक्त आहार पदार्थांचा समावेश असावा.
पाणी अति प्रमाणात पिणे टाळावे व शक्यतो उकळलेले गरम पाणी प्यावे.
सर्दीवरचे काही अनभूत उपचार याप्रमाणे
सर्दीची सुरुवात होते आहे असे वाटताच सितोपलादि चूर्ण पाण्यासह किंवा मधासह घेतल्यास त्याचा उत्तम फायदा होताना दिसतो.
दालचिनी, तमालपत्र, छोटी वेलची, थोडीशी मिरी यांचे वस्त्रगाळ चूर्ण तपकिरीप्रमाणे ओढल्यास किंवा मऊ सुती कापडात बांधून हुंगल्यास नुकताच सुरू झालेला प्रतिश्याय बरा होण्यास मदत मिळते.
सर्दीबरोबरच डोके जड झालेले असल्यास गरम पाण्याचा वाफारा घेतल्यानेही फायदा होतो, पाण्यात निलगिरी तेलाचे दोन-तीन थेंब किंवा तुळशीची पाने, ओवा टाकल्यास चालतो.
सर्दी झालेली असतानाही जर अहितकर, चुकीच्या आहार-विहारामुळे त्याकडे दुर्लक्ष झाले तर सर्दी वाढून ‘दुष्ट प्रतिश्याया’चे रूप धारण करते. यालाच ‘पीनस’ असेही म्हटले जाते. ही अवस्था सर्वाधिक त्रासदायक असून यात कधी नाक बंद पडते तर कधी वाहायला लागते, कधी श्र्वास मोकळेपणाने घेता येतो तर कधी श्र्वासाला त्रास होतो, वास येणे अजिबात बंद होते इतके की मनुष्याला सुगंध-दुर्गंध यातील फरक कळेनासा होते. श्र्वासाला व तोंडाला दुर्गंध यावयास सुरुवात होते.
सर्दीचा हा प्रकार बरा होणे अवघड असते आणि यावर वेळीच योग्य उपचार न केल्यास बधिरता, आंधळेपणा, वास न येणे, अवघड नेत्रविकार, अंगावर सूज, अग्निमांद्य, खोकला वगैरे त्रास होऊ शकतात.
(श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांच्या लेखन, व्याख्यानांतून संतुलन आयुर्वेदद्वारा संकलित)