इंग्लंड विरुद्ध टीम इंडिया यांच्यात लंडनमधील केनिंग्टन ओव्हल येथे कसोटी मालिकेतील पाचवा आणि अंतिम सामना खेळवण्यात येत आहे. भारतीय संघ या मालिकेत 1-2 ने पिछाडीवर आहे. त्यामुळे भारताला ही मालिका बरोबरीत सोडवण्यासाठी कोणत्याही स्थितीत हा सामना जिंकावाच लागणार आहे. त्यामुळे भारतासाठी हा सामना करो या मरो असा आहे. भारताने सामन्यातील पहिल्या दिवसापर्यंत (31 जुलै) 6 विकेट्स गमावून 204 धावा केल्या. तर दुसऱ्या दिवसाच्या खेळाला 1 ऑगस्टला दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी एक वाईट बातमी समोर आली आहे. या सामन्यातून कर्णधार, उपकर्णधारानंतर आता आणखी एका खेळाडूला दुखापतीमुळे बाहरे व्हावं लागलं आहे.
इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याला खांद्याच्या दुखापतीमुळे पाचव्या सामन्यातून बाहेर व्हावं लागलं. तर भारताचा उपकर्णधार आणि विकेटकीपर ऋषभ पंत यालाही झालेल्या दुखापतीमुळे पाचव्या सामन्याला मुकावं लागलंय. या दोघांनाही चौथ्या सामन्यात ही दुखापत झाली होती. त्यानंतर हे दोघे पाचव्या सामन्यातून बाहेर झाले. त्यानंतर आता इंग्लंडला आणखी एक झटका लागला आहे. इंग्लंडचा बॉलिंग ऑलराउंडर ख्रिस वोक्स याला दुखापतीमुळे पाचव्या कसोटीतील उर्वरित खेळाला मुकावं लागलं आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने याबाबतची माहिती सोशल मीडियावरुन दिली आहे.
वोक्सला पाचव्या कसोटीतील पहिल्या दिवशी बाउंड्री लाईनवर बॉल अडवताना दुखापत झाली. करुन नायर याने मारलेला फटका रोखण्याच्या प्रयत्नात ख्रिस वोक्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाऊन पडला. त्यामुळे वोक्सला दुखापत झाली. वोक्स पडल्यानंतर उठला आणि खांदा धरुन बसला. त्यानंतर फिजिओ मैदानात आले आणि वोक्सला बाहेर घेऊन गेले. वोक्सला दुखापतीनंतर फार त्रास जाणवत होता. त्यामुळे त्याच क्षणापासून वोक्सला उर्वरित सामन्याला मुकावं लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. अखेर ती भीती खरी ठरली.
इंग्लंडला मोठा झटका
दरम्यान वोक्सने पहिल्या डावात एकूण 14 ओव्हर बॉलिंग केली. वोक्सने या दरम्यान 3.30 च्या इकॉनॉमीने 46 धावा दिल्या. तसेच वोक्सने केएल राहुल याला आऊट करत एकमेव विकेट घेतली.