पिंपरी : ‘हिंजवडीतील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी माण, मारुंजीतील रस्त्यांचे रुंदीकरण करावे लागेल. काही भागांत नवीन-मोठे रस्ते आवश्यक आहेत. रिंगरोड निर्मिती सुरू आहे. आगामी शंभर वर्षांचा विचार करता शहराच्या पायाभूत विकासासाठी कठोर निर्णय घ्यावे लागत आहेत. पण, एकाही शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही,’’ असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चिंचवड येथे गुरुवारी दिला.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेतील विजेत्या मंडळांना प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात आयोजित बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी आमदार शंकर जगताप, हेमंत रासने, ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, उत्सवप्रमुख अक्षय गोडसे, माजी नगरसेवक राजू गोलांडे, कैलास भांबुर्डेकर आदी उपस्थित होते.
पवार म्हणाले, ‘‘पुणे व पिंपरी चिंचवड शहरांचा विकास करताना नवीन मेट्रो मार्ग विकसित केले जाणार आहेत. देशातील इतर राज्यांप्रमाणे केंद्र सरकारच्या योजनांचा फायदा महाराष्ट्रालादेखील फायदा झाला पाहिजे, या भूमिकेतून मदत घेतली जात आहे.’’
‘‘गणेशोत्सव स्पर्धेमुळे चांगले वातावरण निर्माण होत आहे. गणेशोत्सव आता राज्य उत्सव म्हणून ओळखला जाणार आहे. मंडळांकडून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक सेतू तयार केला जात आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट हे समाजसेवेचे शक्तिकेंद्र झाले आहे.
विविध सामाजिक उपक्रमांतून शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारांचा महाराष्ट्र आपल्याला पुढे न्यायचा आहे,’’ असे पवार म्हणाले.
पुरंदर विमानतळ आवश्यकच
‘‘पुण्यात आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि मोठे रस्ते नाहीत, अशा समस्यांमुळे परदेशांतील उद्योगांना अन्य शहरांचा पर्याय सांगितला जातो. पण, त्यांना पुणेच हवे आहे.
अन्यथा ते परराज्यांत जात आहेत. नवीन आणि जागतिक उद्योग टिकून राहण्यासाठी पुरंदर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ आवश्यक आहे.
यामध्ये जागा जात असल्याने काही शेतकऱ्यांची नाराजी आहे. पण, योग्य मोबदला देऊन त्यांना चांगला पर्याय निर्माण करुन दिला जाईल,’’ असे पवार म्हणाले.
गणेशोत्सव पर्यावरणपूरक व्हावारात्री उशिरा आणि पहाटे मेट्रो सुरू ठेवण्याबाबत चर्चा करणार
न्यायालयाच्या आदेशाचा अवमान होणार नाही, याची काळजी घ्यावी
निर्बंध शिथिल करण्यासाठी न्यायालयात राज्य सरकारमार्फत भूमिका मांडली जाईल
गणेशमूर्ती विसर्जन कुंड, कृत्रिम हौदातच करावे.
पर्यावरणपूरक उत्सवासाठी मंडळांनी सहकार्य करावे.