Water Resources Recruitment : जलसंपदा विभागातील पदभरतीसाठी अभियंत्यांचे आंदोलन
esakal August 01, 2025 06:45 PM

पुणे : राज्यातील जलसंपदा आणि जलसंधारण विभागातील रिक्त पदांच्या शंभर टक्के भरतीसाठी काँग्रेस आणि इंजिनिअर्स असोसिएशनतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या या पदभरतीमुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नैराश्य असून, आपल्या मागण्या सरकारसमोर मांडण्यासाठी विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला.

याविषयी विद्यार्थ्यांशी संवाद साधला असता, ते म्हणाले, ‘‘गेल्या चार वर्षांपासून आम्ही जलसंपदा विभागाच्या कनिष्ठ अभियंता पदासाठी सातत्याने अभ्यास करत आहोत. अनेकांनी आपली नोकरी सोडली, काहींनी कुटुंबापासून दूर राहून दिवस-रात्र मेहनत घेतली. पण आजवर फक्त जाहिरातीसंदर्भात घोषणाच ऐकायला मिळाल्या. या घोषणादेखील अनेकदा खोट्या किंवा दिशाभूल करणाऱ्या ठरल्या. सरकार आमच्या मेहनतीची, वेळेची आणि आशेची सातत्याने थट्टा करत आहे.’’

विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या...
  • जलसंपदा विभागातील कनिष्ठ अभियंता (गट-ब) पदासाठी एप्रिल २०२३ पासून मंजूर भरती जाहिरात तातडीने प्रसिद्ध करण्यात यावी

  • जलसंधारण विभागाच्या स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदांची प्रथमच नियोजित भरती तत्काळ राबवावी

  • जून २०२५ मध्ये मंजूर आकृतिबंधानुसार विभागात १ हजार ५०० हून अधिक नवीन जागा तातडीने भरण्यात याव्यात

  • मागील आठ महिन्यांत तब्बल आठ वेळा भरतीच्या केवळ घोषणाच

भरती प्रक्रियेच्या दिरंगाईने वर्षानुवर्षे स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी नैराश्यात असून, भविष्याची चिंता त्यांना सतावत आहे. सरकारने लवकरात लवकर १०० टक्के पद भरती करून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, अन्यथा येणाऱ्या काळात हजारोंच्या संख्येने विद्यार्थी रस्त्यावर उतरतील.

- नितीन आंधळे, आंदोलक विद्यार्थी

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.