सप्टेंबर 2008 साली मध्ये मालेगाव येथे बॉम्बस्फोट झाला होता. त्यानंतर काल (गुरूवार) एनआयएच्या विशेष न्यायालयाने तब्बल 17 वर्षांनंतर या प्रकरणात मोठा निकाल दिला. मुख्य आरोपी साध्वी प्रज्ञा आणि कर्नल पुरोहितसह सर्व 7ही आरोपींना निर्दोष मुक्त करण्यात आले. याच निकालानंतर आता ATS च्या एका माजी अधिकाऱ्याने मोठा गौप्यस्फोट केला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालवक मोहन भागवत यांना पकडून आणण्याचे आदेश आपल्याला मिळाले होते, असा खुलासा या माजी अधिकाऱ्याने केला आहे.
एटीएसच्या या माजी पोलिस अधिकाऱ्याने केलेल्या दाव्यानुसार, आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांना अटक करण्यास सांगण्यात आले होते. निवृत्त निरीक्षक मेहबूब मुजावर म्हणाले, भगवा दहशतवादाचा सिद्धांत खोटा होता, मला मोहन भागवतांना अडकवण्याचे आदेश देण्यात आले होते. मोहन भागवत यांना अटक करण्यास सांगण्यात आले, जेणेकरून हा स्फोट “भगवा दहशतवाद” आहे हे सिद्ध होईल, असे ते म्हणाले.
महबूब मुजावर यांनी केले मोठे खुलासे
माजी अधिकारी मेहबूब मुजावर म्हणाले, “‘भगवा दहशतवाद’ सिद्ध करण्यासाठी मला या प्रकरणात समाविष्ट करण्यात आले होते. मला संघाचे प्रमुख मोहन भागवत यांना गुंतवण्याचे थेट निर्देश देण्यात आले होते आणि हे आदेश तत्कालीन मालेगाव स्फोटाचे मुख्य तपास अधिकारी परमबीर सिंग आणि त्यांच्या वरिष्ठांनी दिले होते असा दावाही त्यांनी केला. ” मोहन भागवत आणि इतर निष्पाप लोकांना या प्रकरणात अडकवणे, हा सरकार आणि एजन्सींचा उद्देश होता. भगवा दहशतवादाची संपूर्ण संकल्पनाच खोटी होती.” असेही ते म्हणाले.
जिवंत लोकांना मृत घोषित करून नाव चार्जशीटमध्ये टाकण्यात आलं
मुजावर यांनी असाही दावा केला की, ज्या संशयितांना मारण्यात आले होते ते संदीप डांगे आणि रामजी कलसांगरा यांना आरोपपत्रात जाणूनबुजून जिवंत दाखवण्यात आलं होते. ते मृत असूनही मला त्यांचे ठिकाण शोधण्याचे आदेश देण्यात आले होते. जेव्हा मी या गोष्टींचा निषेध केला आणि कोणतेही चुकीचे काम करण्यास नकार दिला तेव्हा माझ्यावर खोटे खटले लादण्यात आले. खोटे खटले दाखल केले, पण मी निर्दोष सिद्ध झालो असेही मेहबूब मुजावर यांनी म्हटले. एवढंच नव्हे तर मुजावर यांनी माजी गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनाही लक्ष्य केले. “हिंदू दहशतवादासारखा सिद्धांत खरोखर होता का?, हे त्यांनी पुढे येऊन सांगावं”, असंही ते म्हणाले.
निर्दोष मुक्तता झालेल्यांबद्दल काय म्हणाले ?
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींना कालच निर्दोष मुक्त करण्यात आले आहे. सर्व निर्दोषांना निर्दोष मुक्त करण्यात आल्याचा मला आनंद आहे आणि मीही यामध्ये थोडे योगदान दिले आहे अशी प्रतिक्रिया मुजावर यांनी दिली
या प्रकरणात काल न्यायालयाचा निकाल आल्यानंतर निवृत्त निरीक्षक मुजावर यांनी काही महत्त्वाचे खुलासे केले आहेत. भाजपच्या माजी खासदार प्रज्ञासिंह ठाकूरसह सर्व 7 आरोपींना निर्दोष सोडण्याच्या निर्णयावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. न्यायालयाच्या निर्णयाने एटीएसने केलेले “बनावट काम” रद्दबातल ठरले आहे असे ते म्हणाले. खरंतर, मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास प्रथम एटीएसकडे होता, त्यानंतर राष्ट्रीय तपास संस्थेला (एनआयए) या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले.
खोटा तपास झाला उघड
एका वरिष्ठ अधिकाऱ्याचे नाव घेत मुजावर पुढे म्हणाले की, या निर्णयामुळे एका बनावट अधिकाऱ्याने केलेल्या बनावट तपासाचा पर्दाफाश झाला. 29 सप्टेंबर 2008 साली झालेल्या मालेगाव बॉम्बस्फोटात सहा जणांचा मृत्यू झाला होता आणि 100 हून अधिक लोकं जखमी झाले होते, त्याची चौकशी करणाऱ्या एटीएस पथकाचा ते एक भाग होतो, असे मुजावर यांनी सांगितले. मोहन भागवत यांना “पकडण्यास” सांगण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला.
एटीएसने त्यावेळी कोणती चौकशी केली आणि का केली हे मी सांगू शकत नाही, असेही ते म्हमाले. पण, मला राम कलसांगरा, संदीप डांगे, दिलीप पाटीदार आणि आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांसारख्या व्यक्तिमत्त्वांबद्दल काही गोपनीय आदेश देण्यात आले होते. हे सर्व आदेश असे नव्हते की कोणीही त्यांचे पालन करू शकेल असेही त्यांनी नमूद केलं.
ऑर्डर पाळल्या नाहीत
मुजावर म्हणाले की त्यांनीही ते आदेश पाळले नाहीत कारण ते (आदेश) “भयानक” होते आणि त्यांना त्या आदेशांचे परिणाम माहित होते. मोहन भागवत यांच्यासारख्या व्यक्तिमत्त्वाला पकडणे माझ्या क्षमतेबाहेर होतं. मी आदेशांचं पालन केलं नाही, म्हणूनच माझ्यावर खोटा खटला दाखल करण्यात आला आणि त्यामुळे माझी 40 वर्षांची कारकीर्द उद्ध्वस्त झाली असा आरोपही त्यांनी केला.