पिंपरी : चिंचवडमधील वाल्हेकरवाडी परिसरात वकिलाच्या वडिलोपार्जित जमिनीवर अतिक्रमण करत ताबा मिळविल्याप्रकरणी पोलिसांनी चार जणांवर गुन्हा दाखल केला. मार्च महिन्यात हा प्रकार घडला होता. याप्रकरणी अॅड. रोहित गोपाळ चिंचवडे (वय ३६) यांनी फिर्याद दिली. त्यावरून सोमवारी (ता. २८) चिंचवड पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अनुराग प्रकाश चिंचवडे, प्रकाश धोंडीबा चिंचवडे, ज्योती प्रकाश चिंचवडे आणि प्रीतम संभाजी चिंचवडे (सर्व रा. वाल्हेकरवाडी) अशी आरोपींनी नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वे नंबर ३९ मधील १३ गुंठे क्षेत्र अॅड. रोहित चिंचवडे यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात आहे. २० मार्च रोजी दुपारी सीसीटीव्ही कॅमेरे गायब असल्याचे त्यांना आढळले. ते जागेवर गेले असताना लाइट मीटर चोरीला गेले होते. संबंधित आरोपी दुसऱ्या एका कॅमेऱ्यात चोरी करताना कैद झाले होते. त्यानंतर २९ मार्च रोजी ते पहाटे गेले असता जागेभोवती कुंपण टाकण्यात आले होते.
‘ही मिळकत अनुराग चिंचवडे यांची वडिलोपार्जित आहे’ असा फलकही लावण्यात आला होता. त्यांनी विचारणा केली असता आरोपी अनुरागने जागा स्वतःची असल्याचा दावा करीत धमकी दिली. एक एप्रिल रोजी आरोपींनी जेसीबीच्या साहाय्याने बांधकाम तोडून भाडेकरूंना धमकावून जबरदस्तीने गाळे रिकामे केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. पोलिसांनी तक्रार अर्जाच्या तपासणीअंती गुन्हा दाखल केला.
आत्महत्येची धमकीअनुराग चिंचवडेने सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत आपण आत्महत्या करणार असल्याची धमकी दिली. पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला असून व्हिडिओच्या सत्यतेची पडताळणी केली जात आहे. आरोपीचा फोन दोन दिवसांपासून लागत नसल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक अंकुश बांगर यांनी दिली.