एकनाथ शिंदे यांनी आमदारांसह बंड केल्यानंतर शिवसेना कुणाची हा प्रश्न उपस्थित झाला होता. शिंदे आणि ठाकरे अशा गटांनी शिवसेना पक्षावर दावा केला होता. त्यामुळे हे प्रकरण कोर्टात गेले होते. आज शिवसेना कोणाची? धनुष्यबाण हे चिन्ह कोणाला मिळणार? याबाबत तातडीने सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. आता यावर 23 ऑगस्ट नंतर सुनावणी होणार आहे. यावर कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांनी भाष्य केलं आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
असीम सरोदे यांनी याबाबत म्हटले की, ‘मूळ ‘शिवसेना’ आणि पक्षचिन्ह ‘धनुष्यबाण’ कुणाचे याबाबतची सुनावणी 23 ऑगस्ट नंतरच घेणार असे सर्वोच्च न्यायालयातील जस्टीस सूर्यकांत यांनी आज स्पष्ट केले.
शिवसेना उद्धव ठाकरे यांच्यातर्फे आज पुन्हा सर्वोच्च न्यायालयात विनंती करण्यात आली की पक्षचिन्हाबाबत तातडीने सुनावणी घ्यावी परंतु 19 ऑगस्ट पासून घटनापीठासमोर राष्ट्रपतींच्या अधिकारांबाबतचे प्रकरण सुनावणीसाठी घेणार असल्याने आणि पक्षचिन्ह याचिकेत सखोल विचार करायचा असल्याने तातडीची सुनावणी घेण्यात येऊ शकत नाही असे कोर्टाचे म्हणणे दिसते.संविधानिक फसवणूक केलेल्या एकनाथ शिंदे गटाचे राजकीय मरण काही दिवस पुढे ढकलले गेले इतकेच.’
दरम्यान, आज सकाळी ठाकरे गटाकडून ज्येष्ठ वकील देवदत्त कामत यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणाचा निकाल लागणे गरजेचे आहे असं म्हणत न्यायालयाकडे या प्रकरणाच्या तातडीच्या सुनावणीची विनंती केली होती. मात्र कोर्टाने ती विनंती फेटाळत तात्काळ सुनावणी घेण्यास नकार दिला होता, त्यामुळे ठाकरे गटाला धक्का बसला होता.
सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे निर्णयामुळे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावरील लढाई लांबली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाचे नाव आणि चिन्ह वापरण्यास दोन्ही पक्ष इच्छुक आहेत. मात्र आता कोर्टाने सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. आगामी निवडणूकीपर्यंत याचा निकाल लागला नाही तर उद्धव ठाकरे गटाला याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता संपूर्ण राज्याचे लक्ष पुढील सुनावणीकडे लागले आहे.