Mumbai Goa Highway Accident: मुंबई - गोवा महामार्गावर रायगड येथे अपघात, चालकाचा पाय तुटला; बस आणि ट्रकची धडक
dainikgomantak August 01, 2025 11:45 PM

रायगड : मुंबई-गोवा महामार्गावर शुक्रवारी सकाळी भीषण अपघात घडला. कोलेटी गावाजवळ एसटी बस आणि ट्रकचा भीषण अपगात झाल्याची माहिती समोर आलीय. या अपघातात ट्रक चालक गंभीर जखमी झाला असून, त्याचा एक पाय तुटला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, ट्रकच्या चालकाकडील बाजूने एसटीने जोरदार धडक दिली, ज्यामुळे ट्रकचा समोरील भाग पूर्णपणे चकणाचूर झाला. धडकेनंतर ट्रकचा भाग आतमध्ये फसला आणि चालकाचा पाय केबिनमध्ये अडकून बसला. यामुळे चालक एका जागी अडकून पडला होता.

अपघाताच्या काही क्षणांतच स्थानिक ग्रामस्थ घटनास्थळी धावून आले. त्यांनी तत्काळ बचावकार्य सुरू करत एसटी बसला लोखंडी साखळदंडांच्या मदतीने मागे खेचले. यामुळे ट्रकचा अडकलेला भाग काहीसा मोकळा झाला आणि बचाव करणाऱ्या नागरिकांनी चालकाला बाहेर काढण्यात यश मिळवले.

यानंतर गंभीर जखमी अवस्थेतील ट्रक चालकाला तातडीने स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले.

दरम्यान, अपघातामुळे मुंबई-गोवा महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्याचे काम हाती घेतले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.